पहिल्या फेरीत ‘व्हीएनआयटी’च वरचढ
By Admin | Updated: June 3, 2015 02:38 IST2015-06-03T02:38:32+5:302015-06-03T02:38:32+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ की ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी). ‘रोबोटिक्स सेंटर’ ...

पहिल्या फेरीत ‘व्हीएनआयटी’च वरचढ
‘रोबोटिक्स सेंटर’ : राजकीय हस्तक्षेपावरच नागपूर विद्यापीठाची दारोमदार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ की ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी). ‘रोबोटिक्स सेंटर’ उपराजधानीतील तांत्रिक शिक्षणाला बळ देणारे असल्यामुळे त्याचे सर्व स्तरांतून स्वागतच होत आहे. उपराजधानीत येणारे ‘रोबोटिक्स सेंटर’ नेमके कुठे येणार याबाबतीत शिक्षण वर्तुळात निरनिराळे कयास लावले जात आहेत. परंतु एकूण सादरीकरण व तयारीमध्ये ‘व्हीएनआयटी’च सरस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारी ‘एबीबी’ कंपनीचे प्रतिनिधी व सिनेअभिनेता विवेक ओबेरॉय यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच ‘व्हीएनआयटी’ येथे भेटदेखील दिली. नागपूर विद्यापीठाने या भेटीचा फार गवगवा केला व अक्षरश: ‘रेड कार्पेट’ स्वागत केले. प्रत्यक्षात तांत्रिक माहितीसंदर्भातील तयारी फारच सुमार होती.
दुसरीकडे ‘व्हीएनआयटी’ने मात्र फारसा गाजवाजा केला नाही व प्रत्यक्ष तयारीवर जास्त भर दिला. एकूणच तयारीमध्ये ‘व्हीएनआयटी’चे पारडे जड आहे. विशेष म्हणजे ‘व्हीएनआयटी’कडून सामंजस्य कराराचा मसुदादेखील कंपनीला सोपविण्यात आला व त्यात काय बदल अपेक्षित आहेत याची विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपावरच नागपूर विद्यापीठाची एकूण दारोमदार आहे. केवळ त्यातूनच हे ‘सेंटर’ विद्यापीठात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण
‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नेमकी काय तयारी आहे याचे ‘व्हीएनआयटी’कडून ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरणच करण्यात आले. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुखांनी प्रेंझेंटेशन दिले. तसेच, विविध शाखांमध्ये रोबोटिक्सचा कसा उपयोग होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक सादर केले. ‘व्हीएनआयटी’त ‘रोबोटिक्स’शी संबंध असलेले काही अभ्यासक्रम सुरू आहेतच. ‘मेकॅट्रॉनिक्स’अंतर्गत विद्यार्थी ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात. शिवाय ‘रोबोटिक्स रिसर्च ग्रुप’मधील प्राध्यापकदेखील तेथे आहेत.
कुठला सोहळा होता का?
नागपूर विद्यापीठातर्फे संबंधित कंपनी व विवेक ओबेरॉय यांना ‘कॅम्पस’मधील दोन इमारती दाखविण्यात आल्या. यातील ‘मॉलिक्युलर बायोलॉजी’ची इमारत नुकतीच तयार झाली असून येथे उर्दू विभागदेखील राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ‘एसएआयएफ’च्या (सोफेस्टीकेटेड अॅनॅलिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी) इमारतीसमोर तर चक्क शुभ्र पांढऱ्या कपड्याने ‘सायडिंग’ लावून एखादा सोहळा असल्यासारखी सजावट करण्यात आली होती. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सामान्य प्रशासन विभागातील बहुतांश कर्मचारी तेथेच तैनात होते.