विवेकानंदांच्या विचारातील शिक्षण पद्धती हवी
By Admin | Updated: October 11, 2015 03:13 IST2015-10-11T03:13:26+5:302015-10-11T03:13:26+5:30
सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा आधार आहे. आम्हाला मॉडर्नाइज व्हायचे आहे पण वेस्टर्नाइज नाही.

विवेकानंदांच्या विचारातील शिक्षण पद्धती हवी
नितीन गडकरी यांचे मत : अ.भा. शैक्षिकमहासंघाचे अधिवेशन
नागपूर: सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आमचा आधार आहे. आम्हाला मॉडर्नाइज व्हायचे आहे पण वेस्टर्नाइज नाही. स्वामी विवेकानंद यांचे विचार स्वीकारून आपण देशातील शिक्षण पद्धती पुढे नेली भारत जगात नंबर एक होईल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या त्रैवार्षिक सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात शनिवारी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा. राष्ट्रीय शैैक्षिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. विमलप्रसाद अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामकृष्ण मिशन विवेकानंद विद्यापीठाचे कुलगुरू स्वामी आत्मप्रियानंद, संयोजक प्रभुजी देशपांडे, शैक्षणिक फाऊंडेशनचे संरक्षक प्रो. के. नरहरी, महामंत्री प्रो. जे.पी. सिंघेल उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, १९४७ च्या काळात कम्युनिस्ट होणे म्हणजे गौरवशाली मानले जात होते. त्यापूर्वी देशात अनेक विचारधारांवर काम करणारे लोक होते. त्यावेळी पंडित नेहरूंनी सोशलिस्ट- कम्युनिस्ट मॉडेल स्वीकारले व तसेच शैक्षणिक धोरणही अंगीकारले.काही प्रमाणात ब्रिटिश राजवटीचाही शिक्षण पद्धतीवर पगडा राहिला. त्याचे परिणामही पहायला मिळाले. आता जगभरातील समाजवादी विचारधारा संपण्याच्या मार्गावर आहे. हंगेरी कम्युनिस्ट देश होता.
एकेकाळी तेथे चौकाचौकात कम्युनिस्ट नेत्यांचे पुतळे लावले होते. आता मात्र सर्व पुतळे तोडून एका संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. रशियातही कम्युनिस्ट राहिले नाहीत. चीनमध्येही लाल बावटा सोडले तर कम्युनिस्ट विचारधारा दिसत नाही. आम्ही भारतीय सांस्कृतिक राष्ट्रवादी विचारधारा मानतो. कुणीही माणूस जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग यावरून मोठा ठरू शकत नाही. तो गुणवत्तेनेच मोठा ठरतो. आम्ही सामाजिक न्याय व समतेचे तत्त्व स्वीकारले आहे. त्यामुळे भारतीय वारसावर आधारित शिक्षण पद्धती आवश्यक आहे, असेही गडकरी म्हणाले.
कट्टरवादापासून देशाला धोका आहे. आम्ही संकुचित नाही. आमचाच धर्म श्रेष्ठ आहे, असे आम्ही सांगत नाही. शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत.
हिंदू राजांनी कधी मशिदी तोडल्या नाहीत. मात्र, अनेक देशात लोक श्रेष्ठत्वातून मंदिरे तोडत आहेत, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.(प्रतिनिधी)