भाजपसाठी विवेक ओबेरॉय व स्मृती इराणी मैदानात
By Admin | Updated: October 13, 2014 01:12 IST2014-10-13T01:12:27+5:302014-10-13T01:12:27+5:30
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे

भाजपसाठी विवेक ओबेरॉय व स्मृती इराणी मैदानात
नागपुरातील उमेदवारांचा प्रचार : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन
नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील भेंडे ले-आऊ ट येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाले, येथील रेशीमबागच्या पाण्यात जादू असून त्यात दिल्लीतील सत्ता हलविण्याची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला ६-७ जागा मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज होता. परंतु सर्वच्यासर्व १० जागांवर विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात स्पष्ट बहुमतात भाजपचे सरकार सत्तेत आले. आता तसेच महाराष्ट्रातही परिवर्तन घडवून आणा व भाजपच्या हातात सत्ता द्या.
महाराष्ट्रात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला १५०ते १६० मिळतील. भाजपची स्वबळावर सत्ता आल्यास गुजरातप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास होईल, असा विश्वास ओबेरॉय यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल सोले यांनीही मार्गदर्शन केले. मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, किशोर वानखेडे, नितीन तेलगोटे, विजय राऊ त आदी व्यासपीठावर उपस्थित होते.जाटतरोडी येथे आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी म्हणाल्या, महाराष्ट्र गत १५ वर्षांपासून वनवास भोगत आहे. परंतु आता येत्या १५ आॅक्टोबर रोजी तो संपणार आहे. मात्र त्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन हवे आहे. तीच परमेश्वराची इच्छा आहे. निवडणुकीनंतर लगेच दिवाळी उत्सव सुरू होणार आहे. यंदाच्या या उत्सवात लक्ष्मी ही कमळावर बसून घरोघरी येणार आहे. यावर्षीची दिवाळी ही लोकशाहीची दिवाळी राहणार आहे.राजकारण हे सेवेचे माध्यम बनले पाहिजे. भाजपची सत्ता येणार असल्याने सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चिंतेत पडले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व दक्षिण-पश्चिम विधानभा मतदार संघातील भाजप उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या सुलेखा कुुंभारे व संदीप जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)