कोरोनात माणुसकीचे दर्शन; मदतीचे हात पुढे आले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:07+5:302020-12-27T04:06:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गणेश हूड नागपूर : मावळत्या वर्षात कोरोना संकट आले. महापालिकेच्या पुढाकारात ७२ सेवाभावी व शासकीय ...

कोरोनात माणुसकीचे दर्शन; मदतीचे हात पुढे आले!
लोकमत न्यूज नेटवर्क
गणेश हूड
नागपूर : मावळत्या वर्षात कोरोना संकट आले. महापालिकेच्या पुढाकारात ७२ सेवाभावी व शासकीय संस्था, नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. चार महिन्यात २१ लाख ७५ हजार गरजूंना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. स्लम भागातील गरीब, दिव्यांग यांनाही ७ हजार ५६६ रेशन किट वाटप करण्यात आल्या. यातून सामाजिक बांधिलकी व माणुसकीचे दर्शन झाले. मदतीसाठी हजारो हात पुढे आले. कार्यालये बंद असताना मनपाचा महसूल विभाग आरोग्य विभाग, सफाई कर्मचारी कर्तव्य बजावत होते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा प्रयत्न झाला. मनपाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन सर्वसाधारण सभा, बैठका सुरू झाल्या. ऑनलाईन बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली. ऑनलाईन कामकाजामुळे भविष्यात तंत्रज्ञानाला पर्याय नसल्याचे संकेत मिळाले. कोरोनामुळे परिवहन सेवा सात महिने ठप्प होती. मनपाची आर्थिक घडी विस्कटली. मूलभूत सुविधांवर परिणाम झाला. विजय झलके यांनी तिजोरीची जबाबदारी स्वीकारली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर विकास कामांना ब्रेक लावल्याचा आरोप झाला. त्यात लॉकडाऊनवरून महापौर संदीप जोशी व तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलाच गाजला. सोशल मीडियावर चर्र्चा रंगली. मात्र आर्थिक संकटातही मनपाचे पाच हॉस्पिटल सुसज्ज झाले. पुढे मुंढे यांची बदली झाली. राधाकृष्णन बी. यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून मनपा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. मावळत्या वर्षात ठरल्यानुसार महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिला. नववर्षात ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी महापौरपदाची सूत्रे स्वीकारतील. पण आर्थिक संकट व वर्षभरानंतर होणारी निवडणूक लक्षात घेता त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.