विश्वकर्मा पतसंस्थेच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूकडे चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:43+5:302021-01-19T04:10:43+5:30
नरेश डोंगरे । नागपूर - विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविण्यात आला आहे. डमी ...

विश्वकर्मा पतसंस्थेच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूकडे चाैकशी
नरेश डोंगरे ।
नागपूर - विश्वकर्मा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविण्यात आला आहे. डमी कर्जदार उभे करून संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालकांनी गोरगरीब ठेवीदारांच्या सव्वादोन कोटी रुपयांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा या प्रकरणात आरोप आहे.
खरबीच्या लांजेवार शाळेमागे असलेल्या आणि शेकडो ठेवीदारांची सभासदसंख्या असलेल्या या पतसंस्थेचे २००५ मध्ये रजिस्ट्रेशन झाले होते. पदाधिकाऱ्यांनी आर्थिक लाभाच्या विविध योजनांचे मृगजळ निर्माण करून संस्थेसोबत शेकडो ठेवीदार जोडले. त्यानंतर संस्थेत कोट्यवधींच्या ठेवी जमा होताच एप्रिल २०१६ पासून संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम तुलसीराम बेले, उपाध्यक्ष नरेश तुलसीराम दांडेकर, व्यवस्थापक दिगांबर आनंदराव येवले, रोखपाल सुवर्णा प्रमोद काकडे आणि संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी अपहार करणे सुरू केले. ठेवीदारांना अंधारात ठेवून डमी कर्जदार उभे करीत परस्पर लाखोंचे कर्ज वाटले गेले. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१९ या तीन वर्षांत उपरोक्त आरोपींनी चक्क २ कोटी २२ लाख ८० हजारांची अफरातफर केली.
दरम्यान, अनेक ठेवीदारांनी एकाचवेळी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केल्याने आरोपी घाबरले. त्यांनी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे संशय निर्माण झाला. पुढे तक्रारी वाढल्यानंतर लेखापरीक्षक पुंडलिक यादवराव पालांदूरकर यांना निबंधकांकडून संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश मिळाले. लेखापरीक्षणात नमूद रकमेचा घोळ उघड झाला. या अफरातफरीला संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक आणि रोखपालासह काही पदाधिकारीही जबाबदार असल्याचा ठपका ठेवून पालांदूरकर यांनी वाठोडा पोलिसांकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार, २४ डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या अफरातफरीची मोठी रक्कम आणि गुंतागुंत लक्षात घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) सोपविण्याचे तीन दिवसांपूर्वी आदेश दिले. त्यानुसार, तपासाची कागदपत्रे ईओडब्ल्यूकडे हस्तांतरित करण्यात आली. आता पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात या घोटाळ्याचा तपास ईओडब्ल्यूचे पथक करणार आहे.
---
अटक टाळण्यासाठी आरोपींची धावपळ
या प्रकरणातील आरोपींनी अटक टाळण्यासाठी धावपळ चालवली आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी असल्याचे समजते.
----