नागपुरात व्हायरस म्युटेशनमुळे वाढला व्हायरल तापाचा अवधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:45 AM2020-02-09T00:45:04+5:302020-02-09T00:46:18+5:30

काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे.

Virus mutation in Nagpur leads to increased viral fever | नागपुरात व्हायरस म्युटेशनमुळे वाढला व्हायरल तापाचा अवधी

नागपुरात व्हायरस म्युटेशनमुळे वाढला व्हायरल तापाचा अवधी

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : चिंता न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही वर्षांपूर्वी ‘व्हायरल फीवर’वर (विषाणूजन्य ताप) औषध घेतल्यास तीन दिवसात रुग्ण बरा व्हायचा. परंतु आता पाच ते सात दिवसाच्या उपचारानंतरही ‘व्हायरल फीवर’ बरा होत नाही. लोकांमध्ये याला घेऊन भीतीचे वातावरण आहे. डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. परंतु असे का होते, यावर विविध तर्क लावले जात आहे. काही डॉक्टरांनी याला, व्हायरसचे बदलते स्वरूप (म्युटेशन) तर कुणी ‘क्रॉस इन्फेक्शन’ला जबाबदार ठरविले आहे. परंतु या सर्वामागे कुमकवत रोगप्रतिकारशक्ती असल्यावर एकमत आहे.
विशेष म्हणजे, मध्यभारतात व्हायरसच्या बदलत्या स्वरूपावर चिंता करण्याची गरज नाही. उपचाराची पद्धत व औषधांची मात्रा बदलविल्यास धोका टाळता येतो.
शहरातील डॉक्टरांनुसार, गेल्या पंधरवड्यात व्हायरल फिवर, सर्दी-खोकला, डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. खासगी इस्पितळातही हेच चित्र आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने व्हायरल फिवर होण्याचा धोका राहत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. व्हायरल फिवरच्या बदलत्या स्वरुपावर काही डॉक्टरांनी औषधांची मात्रा वाढविली आहे. त्याच धर्तीवर काही डॉक्टर आजाराच्या लक्षणावर उपचार करीत आहे. व्हायरलवर प्रतिबंधक लस किंवा औषधे नाहीत. परंतु वारंवार व योग्य पद्धतीने साबणाने हात धुतल्यास, शरीराची स्वच्छता ठेवल्यास, योग्य आहार घेतल्यास या रोगाला काही प्रमाणात दूर ठेवता येते.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावी
कोणत्याही व्यक्तीला व्हायरल फिवर, खूप ताप, सर्दी, खोकला असेल तर त्याने स्वत:हून औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच, औषध घ्यायला हवे, असे सर्वच डॉक्टरांचे सांगणे आहे. आजाराची लक्षणे पाहूनच डॉक्टर औषध देतात. स्वत:हून औषधी घेतल्यास मूत्रपिंड, यकृतावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता असते.

व्हायरसचा जेनेटिक प्रोफाईल बदलत आहे
प्रसिद्ध वरिष्ठ फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, व्हायरसचा ‘जेनेटिक प्रोफाईल’ किंवा ‘डीएनए’मध्ये वेळेनुसार बदल होतो. यामुळे रुग्णांवरही याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. व्हायरसच्या म्युटेशनमुळे आजाराचे दिवस वाढतात. आपल्या देशात लोकसंख्या मोठी आहे. यामुळेही व्हायरलचा प्रकोप गतीने वाढतो. परंतु व्हायरलच्या लक्षणावर प्रभावी औषधे आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

रोगप्रतिकार शक्ती वाढवायला हवी
वरिष्ठ फिजिशियन डॉ.निखिल बालंखे म्हणाले, व्हायरसच्या म्युटेशनमुळे पाच ते आठ दिवसांपर्यंत व्हायरल फीव्हर असतो. यात उपचाराची पद्धत तीच असते, परंतु औषधांचा डोज वाढून दिला जातो. व्हायरल दूर ठेवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज असते.

क्रॉस इन्फेक्शनमुळेही वाढतो वेळ
व्हायरल फीव्हरचे दिवस वाढले आहे. यासाठी ‘क्रॉस इन्फेक्शन’ हे मुख्य कारण असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांचे म्हणणे आहे. परंतु त्यांनी ‘व्हायरस म्युटेशन’च्या शक्यतेला नाकारले आहे. त्यांच्यानुसार ‘म्युटेशन’ला खूप वर्षे लागतात. जर लहान मुलांमध्ये एकदा व्हायरल फीव्हर झाला तर तो दोन-तीन दिवसांपर्यंत राहतो. परंतु दोन किंवा तीन दिवसांत जर पुन्हा खूप जास्त ताप आला असेल, तर पुन्हा व्हायरलचा संसर्ग झाल्याची शक्यता असते.

Web Title: Virus mutation in Nagpur leads to increased viral fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.