रेल्वे बर्थसाठी ‘व्हीआयपी सेटिंग’
By Admin | Updated: November 14, 2015 03:24 IST2015-11-14T03:24:48+5:302015-11-14T03:24:48+5:30
दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तात्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे.

रेल्वे बर्थसाठी ‘व्हीआयपी सेटिंग’
दयानंद पाईकराव नागपूर
दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तात्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. अनेक प्रवाशांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ‘व्हीआयपी सेटिंग’ करण्यावर भर दिल्यामुळे ‘डीआरएम’ कार्यालयात येणाऱ्या व्हीआयपी कोट्याच्या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आली. एरव्ही ४ हजार येणारे व्हीआयपी कोट्याचे अर्ज १० हजारावर पोहोचल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी दिवाळी आणि शुक्रवारी भाऊबीजेचा सण आटोपल्यानंतर अनेक प्रवाशांनी आपल्या परतीच्या प्रवासाची तयारी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी नागपुरातून सर्वच दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल होत्या. मुंबई, पुण्यासह दिल्ली मार्गावरील गाड्यात ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. अनेक प्रवासी शुक्रवारी सायंकाळपर्यंत तात्काळच्या रांगेत उभे होते. तात्काळमध्येही वेटिंगचे तिकीट हाती पडल्यामुळे अनेक प्रवाशांची निराशा झाली. नागपुरातून दिवसाकाळी १०० ते ११५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे बुधवारपासून अनेक प्रवाशांनी राजकीय नेत्यांच्या लेटरपॅडवर बर्थसाठी व्हीआयपी कोट्यात अर्ज करणे सुरू केले आहे. साधारणत: दिवसाकाठी व्हीआयपी कोट्यासाठी ४ हजाराच्या जवळपास अर्ज येतात. परंतु दिवाळी आटोपल्यानंतर या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊन १० हजाराच्या आसपास अर्ज येण्यास सुरुवात झाली. यात नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांचा कोटा बऱ्यापैकी आहे. परंतु दिल्ली, चेन्नई मार्गावरील कोटा अतिशय कमी आहे. त्यामुळे व्हीआयपी कोट्यातून नेमके कुणाला रिझर्व्हेशन द्यायचे याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक प्रवाशांनी व्हीआयपी कोट्यातून अर्ज करूनही पुरेसा कोटा नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळाला नाही. तर काही प्रवाशांना बर्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा झाला. अजून दोन दिवस व्हीआयपी कोट्यासाठी अशाच मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.