वनविकास महामंडळाच्या जागेवर तयार होतोय ‘व्हीआयपी’ रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:12 IST2020-07-29T12:11:44+5:302020-07-29T12:12:18+5:30
राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे.

वनविकास महामंडळाच्या जागेवर तयार होतोय ‘व्हीआयपी’ रस्ता
शरद मिरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एरवी विकास कामे म्हटले की प्रस्ताव, मंजुरी, वर्क ऑर्डर, भूमिपूजन आलेच. यात वर्ष उलटल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. अशात कोणतेही सोपस्कार पार न पाडता अवघ्या १२ तासात १ कि.मी.चा रस्ता तयार झाल्यास आश्चर्यच! कुणी व्हीआयपी व्यक्ती तर येत नाही ना, असा प्रश्न उभा ठाकेल. वनविकास महामंडळाच्या जागेवर असाच एक व्हीआयपी रस्ता तयार करण्यात आला आहे.
राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे. कदाचित हीच संधी साधत एका व्यक्तीने वनविकास महामंडळाच्या जागेवर रस्ता तयार केला. अंदाजे १ कि.मी. अंतरापर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला असून यातील अर्ध्याहून अधिक जागा वनविकास महामंडळाची तर उर्वरित जागा रेल्वे विभागाची आहे. राष्ट्रीय मार्गापासून तयार करण्यात आलेला हा रस्ता थेट एका खासगी ‘फार्महाऊस’ पर्यंत पोहचविण्यात आला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे शासकीय कार्यालयाच्या नजरा बंद असतात. हे हेरूनच एका दिवसात हा रस्ता तयार करण्यात आला. वनविभागाच्या जागेवर रस्ता बनविण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला.
शॉर्टकट सुविधा
भिवापूर जन्मगाव असलेल्या एका वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे हे फार्महाऊस आहे. कऱ्हांडला अभयारण्याला अगदी लागून शेतजमीन असल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात या अधिकाऱ्याने तीन वर्षापूर्वी हे फार्महाउस बांधले. मात्र आवागमनाचा रस्ता लांब पल्ल्याचा असल्यामुळे थेट राष्ट्रीय मार्गावरून फार्महाऊस गाठण्यासाठी हा शॉर्टकट ‘व्हीआयपी’ रस्ता तयार करण्यात आला. त्यासाठी चक्क वनविकास महामंडळाची जागाच कवेत घेतली.
कार्यवाही सुरू आहे
यासंदर्भात वनविकास महामंडळ उत्तर उमरेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. रोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला. कार्यवाही सुरू असून मोक्कास्थळाची ऑन दि स्पॉट पाहणी करणार असल्याचे सांगितले. शिवाय याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.