पत्नीच्या अधिकारांची पायमल्ली, घटस्फोटाचा वादग्रस्त आदेश रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2022 17:40 IST2022-09-26T17:36:00+5:302022-09-26T17:40:02+5:30
Nagpur News स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्यामुळे पत्नीच्या अधिकारांची पायमल्ली झाली, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला घटस्फोट देण्याचा अकोला कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला.

पत्नीच्या अधिकारांची पायमल्ली, घटस्फोटाचा वादग्रस्त आदेश रद्द
राकेश घानोडे
नागपूर : स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळाली नसल्यामुळे पत्नीच्या अधिकारांची पायमल्ली झाली, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला घटस्फोट देण्याचा अकोला कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला, तसेच हे प्रकरण नव्याने कार्यवाही करण्यासाठी कुटुंब न्यायालयाकडे परत पाठविले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणातील पत्नी नांदेड, तर पती अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे ६ मे २००६ रोजी लग्न झाले. त्यांचे एकमेकांसोबत पटत नव्हते. असे असतानाही ते ९ वर्षे सोबत राहिले व दोन अपत्ये जन्माला घातली. दरम्यान, १ जून २०१५ रोजी पत्नी दोन्ही अपत्यांना सोबत घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पतीने जुलै-२०१८ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली होती. पत्नीने ११ जानेवारी २०१९ रोजी न्यायालयात हजर होऊन लेखी जबाब दाखल केला व पतीचे सर्व आरोप फेटाळून लावले, तसेच १५ हजार रुपये मासिक खावटीसाठी अर्ज दाखल केला. पुढे, पत्नी काही तारखांना अनुपस्थित राहिल्यामुळे कुटुंब न्यायालयाने तिच्या पुराव्यांची प्रतीक्षा न करता २२ ऑक्टोबर २०२१ रोजी पतीला घटस्फोट मंजूर केला. त्याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून हा निर्णय दिला.
असे आहेत आरोप-प्रत्यारोप
पत्नीची वागणूक चांगली नाही. ती क्षुल्लक कारणावरून भांडते. आत्महत्या करण्याची व खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देते; परंतु संबंध टिकविण्यासाठी अनेक वर्षे घटस्फोटाची मागणी केली नाही. असे असले तरी पत्नीने स्वत:चा स्वभाव बदलला नाही. तिला सासरी परत आणण्याचे अनेकदा प्रयत्न केले; पण काहीच फायदा झाला नाही, असे पतीचे आरोप आहेत. पत्नीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पती व त्याचे नातेवाईक क्रूरतापूर्ण वागणूक देत होते. त्यामुळे माहेरी निघून जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे पत्नीचे म्हणणे आहे.