कल चाचणीत ‘विनोद’ !
By Admin | Updated: June 16, 2016 03:14 IST2016-06-16T03:14:20+5:302016-06-16T03:14:20+5:30
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली.

कल चाचणीत ‘विनोद’ !
अहवालावर शिक्षणमंत्र्याचा फोटो कसा? : दहावीच्या गुणपत्रिकेची ‘परीक्षा’
नागपूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कुठले क्षेत्र निवडावे यासाठी राज्य शिक्षण मंडळाने पहिल्यांदा कलचाचणी घेतली. या चाचणीचा अहवाल विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसोबत देण्यात आला. या अहवालाचे वैशिष्ट्य असे की, यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत:चा फोटो छापून घेतला आहे. कल चाचणी अहवालातील या ‘विनोदा’मुळे मात्र नवा वाद निर्माण झाला आहे.
दुसरे असे की, चार विषयात नापास झालेल्या एका विद्यार्थ्याचा कल अहवाल बघितला असता, त्यात विद्यार्थ्याचा कल आरोग्य आणि तांत्रिक क्षेत्राकडे असल्याचे दर्शविले. शिक्षण मंडळाने कल चाचणी खरच गांभीर्याने घेतली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
हा प्रकार निषेधार्ह
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करणे, शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार खरोखरच निंदनीय आहे. राज्य शिक्षण मंडळाने हा अहवाल विद्यार्थ्यांना दिला आहे. राज्यात आजपर्यंत अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले. परंतु त्यांनी बोर्डाचा असा दुरुपयोग कधीच केला नाही. स्वत:चा फोटो टाकून शिक्षणमंत्री कुठला संदेश देत आहे. शिक्षण मंत्र्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे.
अनिल गोतमारे, उपाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ