विनय वासनकरला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:25 IST2020-12-15T04:25:58+5:302020-12-15T04:25:58+5:30
नागपूर : गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी विनय जयदेव वासनकर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून ...

विनय वासनकरला जामीन नाकारला
नागपूर : गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी विनय जयदेव वासनकर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी वासनकरला हा दणका दिला. तो २०१४ पासून कारागृहात आहे.
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर याचा विनय हा भाऊ होय. प्रकरणाचा खटला अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे जामीन देण्यात यावा अशी विनंती त्याने न्यायालयाला केली होती. परंतु, न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता त्याला दिलासा देण्यास नकार दिला. वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीने ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवेगळ्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर कंपनीने मुदत संपूनही गुंतवणूकदारांच्या ठेवी परत केल्या नाहीत आणि परतावाही दिला नाही. परिणामी, गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. त्यानंतर झालेल्या तपासामध्ये आरोपींचे पितळ उघडे पडले. आरोपी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून गुंतवणूकदारांना जाळ्यात फसवित होते. कंपनीने नेमलेले एजन्ट्स राज्यभर फिरून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते.