कोळसा खदानीमुळे वरोरातील एकोनाचे गावकरी त्रस्त; पुनर्वसनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 01:44 PM2022-10-11T13:44:45+5:302022-10-11T13:48:36+5:30

सरपंच गणेश चवलेंचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Villagers of Akona in Varora suffering due to coal mining; Demand for rehabilitation | कोळसा खदानीमुळे वरोरातील एकोनाचे गावकरी त्रस्त; पुनर्वसनाची मागणी

कोळसा खदानीमुळे वरोरातील एकोनाचे गावकरी त्रस्त; पुनर्वसनाची मागणी

Next

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स कंपनीने एकोना, वनोजा, चरुरखटी, मार्डा या गावांची जमीन अधिग्रहित करून तेथे खुली कोळसा खदान सुरू केली. खदानीतील स्फोट, कोळशाच्या प्रदूषणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, गावकऱ्यांचे पुनर्वसन न केल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा एकोनाचे सरपंच गणेश चवले यांनी दिला आहे.

एकोना गावातील शेतकऱ्यांची उर्वरित जमीन वेकोलिने संपादित करून गावाचे पुनर्वसन करावे, गावासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची व्यवस्था करावी, माढेळी रोडवरील देवल नाला ते एकोनापर्यंत वेकोलिने सिमेंट रस्ता तयार करून त्याची उंची वाढवावी, कोळसा वाहतूक करताना गावकऱ्यांना अपघात झाल्यास त्याच्या भरपाईची रक्कम निश्चित करावी, प्रदूषण होऊ नये यासाठी कोळसा वाहतूक करताना ताडपत्रीचा वापर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

यासह एकोना गावातील बेरोजगारांना रोजगार द्यावा, सीएसआर फंडातून एकोना गावाचा विकास करावा, खदानीतील स्फोटामुळे घरांमध्ये भेगा पडत असल्यामुळे गावकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, एकोना थांब्यावर बस थांबविण्याची तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, कोळसा वाहतुकीसाठी माढेळी ऐवजी दुसऱ्या मार्गाचा वापर करावा, एकोना गावकऱ्यांसाठी सिमेंट रस्ता तयार करून तेथे स्ट्रीटलाईटची व्यवस्था करावी, खदानीमुळे आजारी गावकऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. बेमुदत उपोषणावेळी गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला वेकोलि जबाबदार राहणार असल्याचे सरपंच गणेश चवले यांनी म्हटले आहे.

Web Title: Villagers of Akona in Varora suffering due to coal mining; Demand for rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.