विजय दर्डा : जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्टमधील विद्यार्थ्यांचा सत्कार

By Admin | Updated: July 5, 2015 02:50 IST2015-07-05T02:50:09+5:302015-07-05T02:50:09+5:30

शिक्षण प्रगतीसाठी आवश्यक आहे पण शिक्षणाचा उपयोग कसा करायचा, हे संस्कारच शिकवतात. पुस्तकी शिक्षणातून आपण ज्ञान मिळवितो ...

Vijay Darda: Students of Jawahar Lal Darda Convent are felicitated | विजय दर्डा : जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्टमधील विद्यार्थ्यांचा सत्कार

विजय दर्डा : जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्टमधील विद्यार्थ्यांचा सत्कार

पुस्तकांच्या पलिकडे खूप शिकण्यासारखे
नागपूर : शिक्षण प्रगतीसाठी आवश्यक आहे पण शिक्षणाचा उपयोग कसा करायचा, हे संस्कारच शिकवतात. पुस्तकी शिक्षणातून आपण ज्ञान मिळवितो पण केवळ सुशिक्षित होऊन समाजाचे आणि स्वत:चे भले होत नाही. त्यासोबतच आपला संस्कार, माता-पित्याचा सन्मान, संवेदनाही जागृत राहायला हव्यात. पुस्तकांच्या पलिकडेही खूप शिकण्यासारखे आहे. त्याच्याशी विद्यार्थ्यांचा संबंध आला पाहिजे. आपल्या संस्कृतीचे हे जीवनविज्ञान आपण सर्वांनी आचरणात आणावे, असे आवाहन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले.
छात्रजागृती संस्थाद्वारा संचालित जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्ट, कळमना रोड येथील इयत्ता दहावीच्या प्रथम बॅचमधील विद्यार्थ्यांनी शाळेचा निकाल शंभर टक्के लावला आहे. शाळेतील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. या गुणवत्ताप्राप्त सहा विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने खा. दर्डा यांच्या हस्ते मोपेड दुचाकी देऊन संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून रणजितसिंह बघेल, माजी मंत्री अनिस अहमद, संस्थेचे सचिव अ‍ॅड. निशांत गांधी, अतुल कोटेचा, उपाध्यक्ष श्रीराम काळे, प्राचार्या धनलक्ष्मी अय्यर उपस्थित होते. खा. दर्डा म्हणाले, आपली जीवनमूल्य हरवत आहेत. सुशिक्षित होतानाच सुसंस्कारित होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातूनच विद्यार्थी महान होऊ शकतात. या शाळेची पहिलीच बॅच यंदा दहावीला होती. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले, याचे समाधान वाटते. या संस्थेच्या उद्घाटनासाठी मी आलो होतो तेव्हापासून आतापर्यंत या शाळेने केलेली प्रगती अभिनंदनीय आहे. अ‍ॅड. निशांत गांधी यांनी ही संस्था प्रगतिपथावर आणली त्याबद्दल त्यांना रमझानच्या पवित्र महिन्यात ईश्वर आशीर्वाद देवो.
निशांत यांचा आचार आणि विचार सारखा आहे. वडिलांकडूनच त्यांना सामाजिक कामाचा संस्कार मिळाला. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते चांगले काम करीत आहेत. सामान्य घरातील मुलांना शाळेतर्फे दुचाकी (मोपेड) सारखी भेट मिळणे, ही आनंदाची बाब आहे. प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून देशात प्राथमिक शिक्षणाकडेच जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्याशिवाय स्थिती बदलणार नाही. याप्रसंगी त्यांनी ए. पी. जे. अब्दूल कलाम, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांचे उदाहरण सांगितले. त्यांनी अभ्यासाच्या काळात अभ्यास केला आणि संस्कार सांभाळले म्हणूनच ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकले, असे ते म्हणाले.
घर हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. जे शिक्षण घरात मिळते, ते बाहेर मिळत नाही. त्यामुळे मुलांनो आपल्या मातापित्याचा आणि गुरुंचा सन्मान करा. तुम्ही महान व्हाल, असे आवाहन खा. दर्डा यांनी केले. निशांत गांधी यांनी प्रास्ताविकातून शाळेचा प्रवास विशद केला. कार्यक्रमाचे संचालन माधुरी ढगे तर आभार मनिषा पोहेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
मोपेड चालवा पण ‘हेल्मेट’ घालूनच
याप्रसंगी सहा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मोपेडच्या किल्ल्या खा. दर्डा यांनी प्रदान केल्या. याप्रसंगी त्यांनी आवर्जून यासोबत हेल्मेट आहे का हे तपासले. वाहन चालविताना हेल्मेट घालूनच चालविण्याचे आवाहन त्यांनी केले आणि सहाही विद्यार्थ्यांकडून तशी शपथच घेतली. केवळ डोक्याला जखम झाल्याने युवकांचे अपघाती मृत्यू होतात त्यामुळे काळजी घ्या आणि सावध रहा, असे ते म्हणाले.
प्रत्येकाने शाळाबाह्य मुलांची जबाबदारी घ्यावी
प्रत्येकाला आता शिक्षणाचा अधिकार आहे. पण अनेक ग्रामीण भागातील मुले आणि प्रामुख्याने मुली शाळेत येऊ शकत नाही. प्रत्येकाने किमान एक मुलगा शाळेत यावा म्हणून प्रयत्न केला तर शाळाबाह्य मुले शाळेत येतील आणि शिक्षण घेतील. प्रत्येकानेच हे काम करावे, असे आवाहन यावेळी खा. दर्डा यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर आपल्या शाळेने भेट म्हणून दुचाकी मोपेड द्यावी, हा क्षण विरळाच. जवाहरलाल दर्डा कॉन्व्हेन्टतर्फे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मोपेड प्रदान करण्यात आली तेव्हा सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पसरला. यात जया जैन, मयुर चौरागडे, सागर साहू, ओम खुंगार, समीक्षा डोंगरे आणि समीर अन्सारी यांचा समावेश होता.

Web Title: Vijay Darda: Students of Jawahar Lal Darda Convent are felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.