वैद्य दाम्पत्याचा खून करणाऱ्यास कठोर शिक्षा करा
By Admin | Updated: November 14, 2016 02:57 IST2016-11-14T02:57:23+5:302016-11-14T02:57:23+5:30
काशीनगर रामेश्वरी येथील वैद्य दाम्पत्याच्या खुनाचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी

वैद्य दाम्पत्याचा खून करणाऱ्यास कठोर शिक्षा करा
बसपाची मागणी : बीआरएसपीचे पाटील पक्षाला बदनाम करीत असल्याचा आरोप
नागपूर : काशीनगर रामेश्वरी येथील वैद्य दाम्पत्याच्या खुनाचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी केली असून बसपामधून निष्कासित करण्यात आलेले बीआरएसपीचे सिद्धार्थ पाटील हे बसपाला बदनाम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बेले यांनी म्हटले आहे, पंढरीनाथ वैद्य यांनी त्यांचे ३७२५ चौ. फुटाच्या भूखंडापैकी ३४० चौ. फूट जागा बसपा कार्यालयासाठी दिली होती. या प्लॉटला लागूनच सिद्धार्थ पाटील यांचा प्लॉट आहे. पाटील यांनी अनेकदा वैद्य कुटुंबाकडे त्यांचा प्लॉट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु वैद्य कुटुंबाला पाटील यांच्यावर विश्वास नव्हता. वैद्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने पंढरीनाथ यांच्या पत्नी प्रमिला वैद्य व इतर सदस्यांनी बसपाला प्लॉट विक्रीसाठी लिखित परवानगी मागितली होती. परंतु त्यांनी बसपाकडून मंजुरी मिळण्यापूर्वीच बिल्डरसोबत सौदा केला. यात बसपाचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता. त्यानंतर बिल्डर आणि प्रमिला वैद्य यांनी बसपाच्या ३४० चौ. फुटाच्या जागेऐवजी नवीन इमारतीमध्ये १००० चौ. फुटाचे पार्टी कार्यालय देण्याचा करार करून रजिस्ट्री केली. यापूर्वी पाटील यांनी संबंधित प्लॉटचे जुने बांधकाम पाडण्यासाठी नासुप्र आणि मनपाकडे अर्ज सुद्धा केला होता. परंतु दुसऱ्यालाच भूखंड विकल्यामुळे पाटील संतापले होते. कुठलेही काम न करता पाटील यांच्याकडे प्लॉट, लॉन आदी कोट्यवधीची संपत्ती आली कुठून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही बेले यांनी केली आहे.