कर्नाटकात दक्षता, महाराष्ट्रात का नाही? ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:06 IST2021-07-04T04:06:17+5:302021-07-04T04:06:17+5:30
रेल्वेत दुर्लक्ष : गर्दी वाढल्यामुळे संसर्गाचा धोका नागपूर : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना ...

कर्नाटकात दक्षता, महाराष्ट्रात का नाही? ()
रेल्वेत दुर्लक्ष : गर्दी वाढल्यामुळे संसर्गाचा धोका
नागपूर : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट किंवा कोरोनाची लस घेतली असल्यास प्रवेश देण्याचे ठरविले आहे. परंतु महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यात खचाखच प्रवाशांची गर्दी होत असून, महाराष्ट्रात दक्षता का घेण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मोजक्यात रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना विशेष रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ९० च्या वर विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत. परंतु महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना काही बंधने घालून दिली आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या प्रवाशांना ७२ तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे आहे नाहीतर किमान कोरोनाची एक लस संबंधित प्रवाशाने घेतलेली असावी, असे बंधन घालून देण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तेथील शासन दक्षता बाळगत आहे. परंतु महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील जनरल कोचमध्ये प्रवाशांची खचाखच गर्दी दिसत आहे. कोचमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती जनरल कोचमध्ये आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे रेल्वे प्रशासन कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देत आहे. परंतु दुसरीकडे जनरल कोचमधील गर्दीकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना रेल्वेगाड्यात होणारी गर्दी टाळावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
.........