परिस्थिती बघून विधानसभेची उमेदवारी
By Admin | Updated: June 10, 2014 01:06 IST2014-06-10T01:06:27+5:302014-06-10T01:06:27+5:30
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष

परिस्थिती बघून विधानसभेची उमेदवारी
माणिकराव ठाकरे यांची माहिती : विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीत काही चुका झाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. चुका सुधारण्यासाठी वेळ आहे. समस्यांवर तातडीने निर्णय घ्यावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली आहे. राज्याचा विकास कुणाच्या नेतृत्वात होऊ शकतो, याची जाण जनतेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे निवडणुका लढवितील असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वत: व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारली आहे. देशातील पराभवाची जबाबदारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्वीकारली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पक्षाने निश्चित केलेल्या धोरणाला प्रदेश काँग्रेसचाही पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच क ाही राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात बिहारमधील सहा जागांपैकी भाजपला एक जागा मिळाली. महाराष्ट्रातील जागेवर काँग्रेसचा विजय झाला. गुजरातमधील सात जागापैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.लोकांना २४ तास वीज, ओबीसींना शिष्यवृत्ती, मागासवर्गींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण असे निर्णय घ्यावे लागेल. तसेच चांगल्या योजनांचे मार्केटिंग झाले नाही अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)