उद्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल; ‘कोटा’ कोण पूर्ण करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 11:13 IST2021-12-13T10:51:25+5:302021-12-13T11:13:51+5:30
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. मतदानाअगोदर झालेल्या राजकीय नाट्यामुळे निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

उद्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल; ‘कोटा’ कोण पूर्ण करणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाअगोदर झालेल्या राजकीय नाट्यामुळे निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख पहिल्या पसंतीची मते मिळवून ‘कोटा’ पूर्ण करतात की चंद्रशेखर बावनकुळे बाजी मारून जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र बदलवतात की रवींद्र भोयर यांच्या पारड्यात मते पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तब्बल १२ वर्षांनंतर या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान झाले व मतदानाची टक्केवारी ९८.९३ टक्के इतकी होती. यात २८३ महिला आणि २७१ पुरुष मतदारांचा समावेश होता. मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर ‘कोटा’ निश्चित करण्यात येईल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळून ‘कोटा’ पूर्ण होईल तो विजयी घोषित होईल. परंतु पहिल्या पसंतीची मते मिळून एकाही उमेदवाराने ‘कोटा’ पूर्ण केला नाही तर दुसऱ्या पसंतीक्रमाच्या आधारे मतमोजणी होईल. यात ‘कोटा’ पूर्ण करणारा उमेदवार विजयी होईल.
मतमोजणीच्या वेळी अगोदर अवैध मते शोधण्यात येतील. प्रथम पसंतीक्रम न दर्शविणे, पसंतीक्रम शब्दांत नोंदविणे, चुकीच्या पद्धतीने क्रमांक लिहीणे, वेगळा पेन वापरणे इत्यादी कारणांमुळे मत अवैध ठरू शकते. मतमोजणीच्या सुरुवातीला २५-२५ चे गठ्ठे तयार करून अवैध मते बाजूला करण्यात येतील.
स्ट्रॉंग रूममध्ये चोख बंदोबस्त
मतदान आटोपल्यानंतर मतपेट्या चोख बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तेथे २४ तास सुरक्षाव्यवस्था असून मतमोजणीच्या वेळी मतपेट्या बाहेर काढण्यात येतील.
दुपारी स्पष्ट होईल चित्र
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सकाळी ८ वाजतापासून चार टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. दुपारी १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकते.