लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोलीच्या सीमेपर्यंत २८ मे रोजी पोहोचलेला मान्सून चार दिवसांपासून जागीच स्थिरावला आहे. बदलती परिस्थिती व वाऱ्याची दिशा बदलल्याने आर्द्रतायुक्त ढग ईशान्येकडे ओढले गेले व जवळ पोहोचूनही नागपूरकरांची मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे. तोपर्यंत ढगांचे गर्जन, विजांचा कडकडाट, वादळवाऱ्यासह पावसाच्या शिंतोड्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागेल. उकाडा मात्र आणखी काही दिवस छळणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ५ जूनपर्यंत जोराच्या वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर व आसपासच्या जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, हा मान्सून नसून हे मान्सूनपूर्वीचे वातावरण आहे. जवळ येऊनही मान्सून विदर्भात सर्वत्र का पोहोचला नाही, यासाठी बदललेली वातावरणीय स्थिती जबाबदार आहे. नागपूरसह विदर्भात तो पोहोचण्यास विलंब लागत आहे. हा विलंब १० दिवस वाढू शकतो, अशी शक्यता आहे.
दरम्यान, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याने नागपूरकरांचे हाल केले आहेत. रविवारीही सूर्यकिरणे अधिक तीव्र भासत होती. दिवसाच्या तापमानात अंशतः वाढ झाली व ३८.२ अंशांची नोंद झाली. पारा अद्यापही सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी कमी आहे.