विदर्भाच्या चळवळीला प्रामाणिक नेतृत्व हवे
By Admin | Updated: December 6, 2015 03:22 IST2015-12-06T03:22:07+5:302015-12-06T03:22:07+5:30
विदर्भाची मागणी ही ९५ वर्षे जुनी आहे. सर्वप्रथम १९२० मध्ये नागपुरातील अधिवेशनात ती झाली होती. त्यावेळी या मागणीला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला होता.

विदर्भाच्या चळवळीला प्रामाणिक नेतृत्व हवे
सुरेश द्वादशीवार : श्रीहरी अणे यांच्या ‘विदर्भगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : विदर्भाची मागणी ही ९५ वर्षे जुनी आहे. सर्वप्रथम १९२० मध्ये नागपुरातील अधिवेशनात ती झाली होती. त्यावेळी या मागणीला स्वत: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली. ज्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली नाही, त्यांना राज्य मिळाले. परंतु विदर्भ वेगळा होऊ शकला नाही. विदर्भ चळवळीचे प्रणेते बापूजी अणे होते. परंतु पुढे या चळवळीला तसे नेतृत्व मिळू शकले नाही. त्यामुळे ही चळवळ भरकटली. आज या चळवळीला प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. जनता तयार आहे. केवळ त्यांना विश्वास देणारे नेते हवे आहेत. असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केला.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ज्येष्ठ विधीज्ज्ञ तथा राज्याचे महाधिवक्ता अॅड़ श्रीहरी अणे लिखित ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर उपस्थित होते. मंचावर अॅड़ श्रीहरी अणे, श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अॅड़ पारोमिता गोस्वामी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, विनोद लोहकरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी व सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते.
यावेळी व्दादशीवार यांच्या हस्ते ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे लेखक अॅड़ श्रीहरी अणे म्हणाले, विदर्भ वेगळा व्हावा की नाही, याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, आणि मागील वर्षी जनतेने तो कौल दिला आहे. काही लोकांना तेलंगणाप्रमाणे हिंसक आंदोलन अभिप्रेत आहे. परंतु ते चूक आहे. माझा त्यावर विश्वास नाही. राज्यघटनेने राज्य निर्मितीसाठी कलम घालून दिले आहे. त्याचा उपयोग करू न वेगळे राज्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
अॅड़ किंमतकर यांनी विदर्भ हा पुन्हा काही दिवस महाराष्ट्रात राहिला तर पूर्ण सत्यानाश होईल, असा संताप व्यक्त करीत विदर्भाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वेगळा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अॅड़ गोस्वामी यांनी वेगळ्या विदर्भाचे आंदोलन अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सध्या विदर्भाचा मुद्दा हा केवळ पैशाभोवती फिरत आहे. मात्र राज्याची मागणी कधीही पैशाच्या आधारे पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अस्तित्वाची लढाई लढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी केले तर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)