वसीम कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरजागडपासून विस्तारित समृद्धी महामार्गापर्यंत ८५ किलोमीटरचा विदर्भातील पहिला मिनरल कॉरिडोर तयार होत आहे. या नव्या कॉरिडोरच्या निर्मितीनंतर सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्याने दोन तासांत कोनसरीला पोहोचणारे स्टील एका तासात पोहोचविणे शक्य होणार आहे.
विदर्भाच्या दुर्गम भागात समावेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे बदलणार आहे. सुरजागड माईन्स ते चंद्रपूर हायवेला जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नवा मिनरल कॉरिडोर तयार करणार आहे. सध्या मालाची वाहतूक हेडरी या एकेरी मार्गाने कोनसरी इंडस्ट्रीयल एरियापर्यंत होते. या मार्गाने कोनसरीपर्यंत १०० किलोमीटर अंतर पार करावे लागते.
या मार्गाने दोन ट्रक विरुद्ध दिशेने आल्यास अडचण होते. त्यामुळे या नव्या ग्रीन कॉरिडोरचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या ८५ किलोमीटरच्या कॉरिडोरमध्ये कुठलाही पूल व अंडरपास राहणार नाही. घनदाट जंगलातून जाणारा हा टु लेन मार्ग राहणार आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची वाहतूक जलदगतीने होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
डीपीआर तयार१० मीटर रुंदीच्या या दोन लेनच्या मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येऊन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सूत्रांनुसार या प्रकल्पासाठी निधीचा कुठलाही तुटवडा नाही. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या कॉरिडोरचे काम सुरू होऊ शकते. समृद्धी महामार्गाचा विस्तार झाल्यानंतर हे स्टील इतर भागात जलदगतीने पाठविता येणार आहे. मिनरल कॉरिडोर चंद्रपूर हायवेला नवेगाव मोरेसोबत जोडण्यात येणार असून, विस्तारित समृद्धी महामार्गाला सेलडोहपासून कनेक्ट होणार आहे.