‘आॅटो हब’ने बदलणार विदर्भाचा चेहरा
By Admin | Updated: November 7, 2015 03:29 IST2015-11-07T03:29:18+5:302015-11-07T03:29:18+5:30
विदर्भाची आर्थिक स्थिती बदलविण्याची शक्ती आॅटोमोबाईल हबमध्ये आहे. नागपुरात असा हब साकार झाला तर स्थानिक उद्योगांना चांगले दिवस येतील.

‘आॅटो हब’ने बदलणार विदर्भाचा चेहरा
लोकमतच्या चर्चासत्रात व्हीआयए पदाधिकाऱ्यांचे मत
नागपूर : विदर्भाची आर्थिक स्थिती बदलविण्याची शक्ती आॅटोमोबाईल हबमध्ये आहे. नागपुरात असा हब साकार झाला तर स्थानिक उद्योगांना चांगले दिवस येतील. त्यामुळे मुंबईनंतर नागपूरही देशाचे आर्थिक केंद्र होईल.
यासाठी सरकारी हस्तक्षेपाची नितांत आवश्यकता आहे. शासकीय पुढाकाराने मोठे उद्योग नागपुरात आले तर संपूर्ण विदर्भाचा आर्थिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. येथे आॅटोमोबाईल उद्योग आले तर अनेक पूरक उद्योगही येतील. त्यामुळे एकूणच परिसराचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल, असे मत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
लोकमत भवनात लोकमतच्यावतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्रात व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, माजी अध्यक्ष प्रफुल्लभाई दोशी, उपाध्यक्ष अनिल पारख, आसित सिन्हा, सचिव रोहित अग्रवाल, सहसचिव पंकज बक्शी, एनर्जी सेलचे संयोजक आर. बी. गोयनका आणि लेडीज एंटरप्रिनर विंगच्या अध्यक्ष वंदना शर्मा सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूरसहीत विदर्भातील उद्योगाच्या वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकला. मुंबई नंतर नागपूरला आर्थिक राजधानी करायचे असेल तर येथे मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पुढाकाराची गरज आहे.
वीज महाग झाल्याने स्टील रोलिंग मिल्स बंद झाल्या आहेत. त्याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यावर झाला आहे.
कायद्याच्या जटीलतेमुळे उद्योजक कागदी प्रक्रियातच जास्त गुंतले आहेत. प्रत्येक आवश्यक परवान्यासाठी सातत्याने मुंबई, पुण्याच्या चकरा त्यांना माराव्या लागतात.
गुन्हेगारी तत्त्वांच्या दहशतीमुळे उद्योजकांना सुरक्षा रक्षकासह रात्री पेट्रोलिंगही करावे लागते. औद्योगिक भागात घाण आणि कचरा ‘स्वच्छ भारत’ अभियानाची धज्जी उडवित आहेत. या समस्यांशिवाय व्हीआयएच्यावतीने विदर्भातील उद्योग विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. व्हीआयए शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचाही प्रयत्न करते आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)