विदर्भाच्या स्वप्नाचा महाल उजाड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:32+5:302021-06-27T04:06:32+5:30
तीन-तीन महिन्यांच्या एक्स्टेंशनवर कर्मचारी करताहेत काम लोकमत न्यूज नेटवर्क कमल शर्मा नागपूर : एकेकाळी विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर राज्य सरकारला ...

विदर्भाच्या स्वप्नाचा महाल उजाड ()
तीन-तीन महिन्यांच्या एक्स्टेंशनवर कर्मचारी करताहेत काम
लोकमत न्यूज नेटवर्क
कमल शर्मा
नागपूर : एकेकाळी विदर्भाच्या विकासाच्या मुद्यावर राज्य सरकारला वेसण घालणारे विदर्भ विकास मंडळ सध्या सुस्त पडले आहे. कार्यकाळ विस्ताराची मंजुरी न मिळाल्याने मंडळ सुस्त पडले आहे. प्रभावहीन झाले आहे. कर्मचारी रोज येतात. परंतु त्यांच्याकडे कुठलेही विशेष काम नाही. नाईलाजाने टाइमपास करावा लागतो. वरून या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या भविष्याची चिंताही सतावत आहे. मागील १४ महिन्यांपासून या कार्यालयाद्वारे विदर्भाच्या समस्यांसदर्भात कुठलेही संशोधन झालेले नाही. अध्ययनही बंद पडले आहे. एकूणच विदर्भाच्या स्वप्नांचा हा महाल उजाड पडला आहे.
३० एप्रिल २००० रोजी राज्यातील तिन्ही विकास मंडळ- विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. १४ महिन्यानंतरही कार्यकाळ विस्ताराचा निर्णय न झाल्याने आता मंडळाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता कार्यकाळ कायम ठेवण्यासाठी राष्ट्रपतींचे आदेश आवश्यक झाले आहे. विकास मंडळात कार्यरत अधिकारी-कर्मचारी सुद्धा आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. येथे एकूण १७ पदे मंजूर आहेत. ४ पद रिक्त पडले आहेत. उर्वरित १३ अधिकारी-कर्मचारी दररोज कार्यालयात येत आहेत. जॉईंट डायरेक्टरचे पदही येत्या ३० तारखेला सेवानिवृत्तीमुळे रिक्त होईल.
कधीकाळी या कार्यालयाच्या मार्फत विदर्भाचे प्रश्न, समस्या यांवर विशेषज्ज्ञांची टीम अहवाल तयार करायची. विदर्भावर अभ्यास व्हायचा. सरकारकडून झालेले अन्याय पुढे आणले जायचे. परंतु आता ही सर्व कामे ठप्प पडली आहेत. कर्मचाऱ्यांकडे आता कुठलेही काम नाही. विशेष निधीचा हिशेब केला जात असल्याचे केवळ सांगण्यापुरतेच आहे. मंडळाची अवस्था पाहून विदर्भातील जिल्हाधिकारी सुद्धा त्यांचे ऐकत नाही. तीन जिल्ह्यांनी हिशेब सुद्धा दिलेला नाही. अशा परिस्थितीत केवळ कार्यालयात येणे आणि घरी जाणे इतकेच काम उरले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या १४ महिन्यांपासून तीन-तीन महिन्यांचे एक्स्टेंशन मिळत आहे. ३१ जुलै रोजी एक्स्टेंशनचा कालावधी समाप्त होईल. अशा परिस्थितीत सरकार पुन्हा एक्स्टेंशन देईल की त्यांना इतर कार्यालयात पाठवले जाईल, हे स्पष्ट नाही. कर्मचारी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत.
कार्यालय परिसरात श्वानांचा वावर
मंडळाची इमारत अतिशय देखणी व सुसज्ज आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. दिवंगत मधुकरराव किम्मतकर यांच्या नावाने विदर्भाशी संबंधित पुस्तकांचे वाचनालय सुद्धा आहे. परंतु याचा काहीही उपयोग होत नाही आहे. वरून पार्किंगच्या जागेत आणि पायऱ्यांवर श्वानांचा वावर वाढला आहे.