विदर्भ विरोधकांना देणार निवडणूकपूर्व इशारा

By Admin | Updated: September 19, 2014 00:55 IST2014-09-19T00:55:55+5:302014-09-19T00:55:55+5:30

जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची

Vidarbha will give antitank warning to the opponents | विदर्भ विरोधकांना देणार निवडणूकपूर्व इशारा

विदर्भ विरोधकांना देणार निवडणूकपूर्व इशारा

नागपूर : जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची सुरुवात होणार असून पवित्र दीक्षाभूमी येथे याचा समारोप होणार आहे. वेगळ््या विदर्भाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष व नेत्यांना विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही यात्रा म्हणजे खणखणीत इशाराच मानण्यात येत आहे.
हा जनतेचा लढा असल्यामुळे या यात्रेचे नेतृत्व कोणत्याही एका व्यक्तीकडे नसेल. यात्रेच्या अग्रभागी असलेल्या रथावर जिजाऊ, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा राहणार आहेत अशी माहिती जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर यांनी दिली. वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी अनेक राजकीय पक्ष किंवा नेते इच्छुक नाहीत. जनमानसाच्या भावनांचा सातत्याने अनादर करणाऱ्या या पक्षांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही यात्रा म्हणजे इशाराच राहणार आहे. विदर्भाला विरोध करणाऱ्या पक्ष व नेत्यांना मतदान करू नये ही भूमिका या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
तीन हजारांहून अधिक लोक सहभागी होणार
सिंदखेडराजा येथून सुरुवातीला विदर्भाच्या अकरा जिल्ह्याची प्रत्येकी एक अशा ११ गाड्या निघणार आहेत. त्यानंतर ठिकठिकाणच्या टप्प्यांवर निरनिराळ््या जिल्ह्यातून चारचाकी गाड्या या यात्रेत सहभागी होणार आहेत.
शिवाय नागपुरात दाखल होण्याअगोदर वाडी येथून शेकडो दुचाकीदेखील यात्रेत सामील होतील. या यात्रेत ५०० हून अधिक चारचाकी गाड्यांत तीन हजारांहून अधिक विदर्भवादी नागरिक सहभागी होतील असा विश्वास जनमंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यात्रेचे अगदी परिपूर्ण नियोजन करण्यात आले असून वैद्यकीय चमूदेखील सोबत राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
या यात्रेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. इच्छुक नागरिकांनी जनमंचच्या प्रीमियम प्लाझा, खरे टाऊन,धरमपेठ, नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
असा राहणार प्रवास
२० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंदखेडराजा येथून या यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर चिखली, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर मार्गे सायंकाळी अमरावती येथे ती पोहोचेल. अमरावती येथे मुक्काम करून २१ सप्टेंबर रोजी मोझरी, तळेगाव, कारंजा, कोंढाळी, गोंडखैरी, वाडी, व्हेरायटी चौक, लोकमत चौक, रहाटे कॉलनी या मार्गाने ही यात्रा सायंकाळी ५.३० वाजता दीक्षाभूमी येथे पोहोचेल. दीक्षाभूमी येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर, जनमंचचे मार्गदर्शन चंद्रकांत वानखडे व प्रा.शरद पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Vidarbha will give antitank warning to the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.