विदर्भ राज्य आंदोलनाची गुढी उंच उभारू
By Admin | Updated: April 9, 2016 03:14 IST2016-04-09T03:14:58+5:302016-04-09T03:14:58+5:30
विदर्भाचा विकास करायचा असेल तर आता स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाची गुढी आता इतकी उंच उभारू ...

विदर्भ राज्य आंदोलनाची गुढी उंच उभारू
‘लढा विदर्भाचा’ : विदर्भ राज्य समन्वय समितीच्या कार्याचा शुभारंभ
नागपूर : विदर्भाचा विकास करायचा असेल तर आता स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाची गुढी आता इतकी उंच उभारू की ती पंतप्रधानांनाही दिसली पाहिजे. आता स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, असे त्यांना वाटले पाहिजे, असे आश्वासन विदर्भ राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी दिले.
वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषद, वेद आणि जनमंच या समविचारी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ‘लढा विदर्भाचा’ या नावाने विदर्भ राज्य समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या कार्याचा शुभारंभ शुक्रवारी सन्मान लॉन बजाजनगर चौक येथे करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, हरिभाऊ केदार, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे प्रामुख्याने उपस्थित होते.
अॅड. अनिल किलोर म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सर्वांच्याच पाठबळाची गरज आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा या समन्वय समितीला पूर्ण पाठिंबा आहे. वेगळ्या विदर्भासाठी होणारे आंदोलन हे जाळपोळ, तोडफोड व लोकांना नुकसान पोहोचेल, असे होणार नाही तर ते वैधानिक पद्धतीनेच केले जाईल. परंतु विदर्भवाद्यांची सहनशीलता तपासून पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. १ मे पर्यंत सरकार या मुद्यावर कोणती भूमिका घेते हे पाहिले जाईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही कुठलीही निवडणूक लढणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधणार नाही. जो पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करेल, तो पक्ष आमचा अशी भूमिका राहील. या आंदोलनात युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडले जाईल आणि गावागावात जनजागृती केली जाईल. विदर्भ विदर्भ म्हणजे केवळ नागपूर नव्हे तर पश्चिम भागही येतो. त्यामुळे विदर्भातील सर्व ११ ही जिल्ह्यात जनजागृती केली जाईल. विदर्भ राज्य झाले तर पश्चिम विदर्भाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा प्रयत्न केला जाईल, असेही अॅड. अनिल किलोर म्हणाले.
याप्रसंगी हरिभाऊ केदार व उमेश चौबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. नितीन रोंघे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारा विदर्भावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)
विदर्भ आंदोलनासाठी आता मार्गदर्शकाचीच भूमिका
ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले, स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत अनेक वर्षांपासून नेतृत्व करीत आलो आहे. परंतु आता कुठलेही नेतृत्व स्वीकारणार नाही, केवळ मार्गदर्शकाचीच भूमिका निभावणार असा निर्णय आपण घेतला आहे. नवीन नेतृत्व पुढे येण्याची आवश्यकता आहे. परंतु हे तितके सोपे नाही. विदर्भाचे आंदोलन हे जनआंदोलन करावे लागले. लोकमानसात जागृती करावी लागेल. विदर्भाबाबत ‘लोकमत’ तयार करावे लागले. यासाठी दोन -चार वर्षांची योजना आखावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भ राज्य समन्वय समितीची कार्यकारिणी
याप्रसंगी विदर्भ राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांची घोषणा केली.
अध्यक्ष - अॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष- देवेंद्र पारेख, महमूद अन्सारी, सचिव - राजेंद्र मिश्रा, सहसचिव - राम आखरे, प्रदीप माहेश्वरी, कोषाध्यक्ष- गिरीश गांधी, सदस्य- बाळ कुलकर्णी, विलास काळे, अमिताभ पावडे, विलास कांबळे, मिलिंद राऊत, नवीन मालेवार, अॅड. उषा पांडे, आशुतोष दाभोळकर, डॉ. अंजली पाटील-गायकवाड, रिना सिन्हा, विनिता माथूर.
मार्गदर्शक : दत्ता मेघे, रणजित देशमुख, गेव्ह आवारी, डॉ. नितीन राऊत, मारोतराव कोवासे, अनिल देशमुख, मधुकरराव किंमतकर, तुकाराम बिरकड, सुदर्शन निमकर, संजय खाडके, उमेश चौबे, हरिभाऊ केदार, प्रा. शरद पाटील,
निमंत्रित सदस्य : आ. विजय वडेट्टीवार, आ. आशीष देशमुख, आ. समीर मेघे, आ. चरणदास वाघमारे.