येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक पाऊस!
By Admin | Updated: October 10, 2016 03:06 IST2016-10-10T03:06:04+5:302016-10-10T03:06:04+5:30
शेतक-यांची चिंता वाढली!

येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक पाऊस!
अकोला, दि. ९- सप्टेंबर महिन्यात पावसाने सुरुवात केल्यापासून अद्याप उसंत दिली नाही. भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुन्हा येत्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात पेरसेवणी, सालेकसा येथे ५0 मि.मी. (५ से.मी.) पावसाची नोंद झाली आहे, तर मौदा येथे ४0 मि.मी., मोहाडी फाटा, मूल येथे २0 मि.मी. तसेच आमगाव व कामठी येथे १0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव,अम्बोणी, दावडी, कोयना (नवाज), कोयना (पोफळी) ताम्हिणी येथे १0 मि.मी. पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्रात वेल्हे येथे १0 मि.मी. पाऊस झाला. कोकण-गोव्यात डहाणू, २0 मि.मी., कल्याण, पालघर, ठाणे येथे प्रत्येकी १0 मि.मी. पाऊस झाला आहे.
दरम्यान, येत्या चोवीस तासांत १0 ऑक्टोबरला कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबर रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.