विदर्भ पॅटर्नची कर्नाटकात जादू !
By Admin | Updated: September 16, 2014 02:19 IST2014-09-16T02:19:49+5:302014-09-16T02:19:49+5:30
विकासाच्या बाबतीत मागासलेल्या प्रदेशात (विदर्भात)

विदर्भ पॅटर्नची कर्नाटकात जादू !
विधानसभाध्यक्षांनी घेतली माहिती : विधिमंडळाची केली पाहणी
नागपूर : विकासाच्या बाबतीत मागासलेल्या प्रदेशात (विदर्भात) विधिमंडळाचे अधिवेशन घेऊन तेथील प्रश्नांवर चर्चा घडवून आणणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या ‘विदर्भ पॅटर्न’चा अभ्यास करण्यासाठी सोमवारी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी नागपूरला भेट दिली. अधिवेशनाची जागा, मंत्री, आमदारांची निवासव्यवस्थेची माहिती घेतानाच त्यांनी विदर्भ राज्याचा इतिहास आणि अधिवेशन होण्यामागची कारणेही जाणून घेतली.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी विदर्भात स्वतंत्र राज्यासाठी आंदोलने सुरू होती. मात्र मराठी भाषिकांचे एकच राज्य या मुद्यावर विदर्भाने संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेताना संयुक्त महाराष्ट्रासाठी आग्रही असणाऱ्या तत्तकालीन नेतृत्वाने विदर्भाचा विकास करण्याचे अभिवचन दिले होते व ते पूर्ण करण्यासाठी या भागात विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याचेही मान्य केले होते. ती परंपरा अद्यापही कायम आहे.
विदर्भात येऊन या भागातील प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही सीमावर्ती भागातील विकासाचे प्रश्न ऐरणीवर आले असून आंदोलने सुरू झाली आहेत. तेथील असंतोष दूर करण्यासाठी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘विदर्भ पॅटर्न’ राबविला जातो त्याच धर्तीवर कर्नाटकमध्ये राबविता येऊ शकतो काय, याचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. थिमप्पा आणि उपाध्यक्ष एन.एच. शिवशंकर रेड्डी यांनी सोमवारी नागपूरला भेट दिली. येथील विधानभवन, विधान परिषदेचे सभागृह, मंत्री आणि आमदारांच्या निवासाची व्यवस्था असलेले अनुक्रमे रविभवन आणि आमदार निवासाला भेट देऊन पाहणी केली.
अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची माहिती घेतली. अॅड. मधुकर किंमतकर यांनी त्यांना विदर्भाचा इतिहास, विदर्भ राज्यासाठी झालेले आंदोलन, संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करताना तत्कालीन नेतृत्वांनी दिलेली आश्वासने, त्यानुसार नागपूरमध्ये होणारे विधिमंडळाचे अधिवेशन, मागासभागासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार होणारे निधीचे वाटप आणि त्यासंदर्भातील घटनात्मक तरतुदी याची सविस्तर माहिती या दोन्ही नेत्यांना दिली. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीला भेट
कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दुपारी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाचे दर्शन घेतले आणि दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. या स्मारकाच्या आतील छायाचित्र प्रदर्शनाचे अवलोकनही त्यांनी केले, तसेच स्मारकाचीही माहिती त्यांनी घेतली.