विदर्भ-मराठवाडा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे
By Admin | Updated: June 5, 2017 02:09 IST2017-06-05T02:09:26+5:302017-06-05T02:09:26+5:30
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने यापूर्वी झारखंड, तसेच वाराणसी येथे कृषी विकास व दूध उत्पादनाचे चांगले काम केले असून ...

विदर्भ-मराठवाडा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत रामगिरीवर बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने यापूर्वी झारखंड, तसेच वाराणसी येथे कृषी विकास व दूध उत्पादनाचे चांगले काम केले असून त्याच धर्तीवर विदर्भ व मराठवाड्यात काम करून या भागाचा विकास साध्य करावा. शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या ११ जिल्ह्यातील सुमारे तीन हजार गावात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड दूध संकलन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. अल्पावधीतच एनडीडीबी, मदर डेअरीने सुमारे ४० हजार लिटरपर्यंत दूध संकलन सुरू केले असून शेतकऱ्यांचाही चांगला सहभाग मिळत आहे. याच धर्तीवर विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आपले कार्यक्षेत्र वाढवावे यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रामगिरी येथे विदर्भ व मराठवाड्यातील कृषी विकास, दूध उत्पादन, मत्स्य विकास, तसेच संत्र्यासह फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय संस्था, विविध विद्यापीठ तसेच राज्य शासनाच्या विविध विभागाचे समन्वयासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप राठ, व्यवस्थापकीय संचालक शिवा नागराजन, आ. सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, डॉ. आशिष देशमुख, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, प्रकाश गजभिये, तसेच केंद्र शासनांच्या विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या कापूस अनुसंधान केंद्र, निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, मृदा संशोधन विकास केंद्रासह पंजाबराव कृषी विद्यापीठ, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील विविध योजना, प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन समन्वयाने काम करून प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधन विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त दूध देणाऱ्या देशातील गीर, साहिवाल, यासह प्रजातींचे सिमेन्सचा वापर करून दूध उत्पादन वाढविण्यासाठीचा उपक्रम राबवितांनाच मदर डेअरी व एनडीडीबी यांनी विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या पशुखाद्य व चाऱ्याच्या प्रजातीच्या विकासाला प्रोत्साहन देण्याबाबत सहकार्य करावे, अशी सूचना केली. केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबूवर्गीय फळसंशोधन केंद्रामधून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनासोबतच समन्वय करून शेतकऱ्यांना संशोधित वाण उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली.
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेती विकासाला आवश्यक असणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असेही यावेळी सांगितले.
केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबूवर्गीय फळसंशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी विदर्भ व मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतात प्रत्यक्ष कोणती मदत लागते याची माहिती घेत त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. विदर्भात रेशीम उत्पादन वाढीसाठी आवश्यक संशोधन करून शेतकऱ्यांच्या शेतीशाळा आयोजित कराव्यात, असे ते म्हणाले.