विदर्भातील किल्ले स्फूर्ती केंद्रे
By Admin | Updated: October 12, 2015 02:51 IST2015-10-12T02:51:46+5:302015-10-12T02:51:46+5:30
विदर्भात ३२ किल्ले आहेत. त्यापैकी तीन घनदाट जंगलात आहे. या किल्ल्यांमुळे विदर्भाची वेगळीच प्रतिभा निर्माण झाली आहे.

विदर्भातील किल्ले स्फूर्ती केंद्रे
‘गड संवर्धन’ कार्यशाळा : श्रीपाद चितळे यांचे प्रतिपादन
नागपूर : विदर्भात ३२ किल्ले आहेत. त्यापैकी तीन घनदाट जंगलात आहे. या किल्ल्यांमुळे विदर्भाची वेगळीच प्रतिभा निर्माण झाली आहे. विदर्भातील किल्ले ऐतिहासिक ठेवाच नव्हे, तर नवीन पिढीसाठी स्फूर्ती केंद्रे ठरत असल्याचे प्रतिपादन पुरातत्त्व अभ्यासक श्रीपाद चितळे यांनी केले.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय आणि गड संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एक दिवसीय ‘गड संवर्धन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यशाळेचे उद्घाटन राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. भा. रा. अंधारे, बी. एस. गजभिये, गड संवर्धन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, पुणे येथील डेक्कन कॉलेजचे संशोधन सहायक डॉ. सचिन जोशी, गड संवर्धन समितीचे सदस्य प्रफुल्ल माटेगांवकर व डॉ. विराग सोनटक्के उपस्थित होते. यावेळी राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून ऐतिहासिक वास्तुंमध्ये केवळ किल्लेच नाही, तर अनेक प्राचीन मंदिरे व वास्तुंचाही समावेश होत असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्याची गरज आहे.
परंतु अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील एका ऐतिहासिक किल्ल्याची विक्री करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एखाद्या ऐतिहासिक वास्तुचा अशाप्रकारे खरेदी-विक्री व्यवहार कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करू न, राज्य शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली. शिवाय संबंधित गावकऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेउन,अशा ऐतिहासिक वास्तुंची खरेदी-विक्री रोखली पाहिजे,असे त्यांनी आवाहन केले. भा. रा. अंधारे यांनी विदर्भातील किल्ल्यांची माहिती देताना, त्यांच्या संवर्धनाची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील किल्ले केवळ पर्यटन स्थळे नाहीत, तर एक गौरवशाली ऐतिहासिक व सामाजिक वारसा असल्याचे ते म्हणाले. या कार्यशाळेत पुरातत्त्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत डॉ. सचिन जोशी, डॉ. अभिजित दांडेकर व डॉ. रघुनाथ बोरकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)