विदर्भात पुढचे पाच दिवस गारपीट, अवकाळीचे सावट, नागपुरात सर्वाधिक घसरला पारा
By निशांत वानखेडे | Updated: April 23, 2023 19:50 IST2023-04-23T19:49:48+5:302023-04-23T19:50:08+5:30
विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे.

विदर्भात पुढचे पाच दिवस गारपीट, अवकाळीचे सावट, नागपुरात सर्वाधिक घसरला पारा
नागपूर : विदर्भात उन्हाळी की पावसाळा हेच कळेना झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले अवकाळीचे सत्र पुढचे पाच दिवस पुन्हा सुरू राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २७ एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, विजांचे गर्जन व वादळासह गारपीटही हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर दाेन दिवस ढगाळ वातावरण राहिल व पुढे परिस्थिती सुधारण्याचा अंदाज आहे.
यावर्षी १० एप्रिलपासून काही दिवस उन्हाचे चटके त्रासदायक ठरले हाेते. दिवसाचा पारा ३९ ते ४१ अंशाच्या आसपास राहिला. १९ एप्रिल राेजी नागपूरचे तापमान ४२ अंशावर गेले, जे या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वाधिक हाेते. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरीसह अकाेला, वर्धा, वाशिम या शहरांचा पारा ४३ अंशाच्या वर गेला हाेता. २० एप्रिलपासून अवकाळीचे ढग आकाशात जमा झाले आणि पारा खाली घसरत गेला.
रविवारी नागपूरचे कमाल तापमान सर्वाधिक ६ अंशाने घसरत ३५.३ अंशावर आले. त्यामुळे दिवसभर ढगांची गर्दी नसली तरी उन्हाची तीव्र जाणीव झाली नाही. शनिवारी गारपीटीसह पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे रविवारी सकाळी ८.३० वाजता पर्यंत नागपुरात १५.५ मिमी पावसाची नाेंद झाली. सकाळीही पावसाचे किरकाेळ थेंब पडले. त्यानंतर दिवसभर उघडीप दिली. त्यामुळे पावसासह उन्हापासूनही दिलासा मिळाला. शहरात रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा ५.५ अंशाने घसरत १९.४ अंशावर पाेहचले. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.
नागपूरसह विदर्भातही पाऱ्याच्या घसरणीचा क्रम सुरू आहे. गाेंदियात ५.१ अंशाने घसरत ३५.५ अंश, वर्ध्यात ४.७ अंशाने घसरत ३७ अंश, चंद्रपुरात ३.८ अंशाने घसरत ३८.२ अंश तर अमरावती, अकाेल्यात ३.६ व ३.२ अंशाने घसरत ३७ व ३८.३ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. सर्व शहरात रात्रीचा पाराही २ ते ६ अंशापर्यंत घसरत २० ते २२ अंशापर्यंत नाेंदविण्यात आला आहे. वादळ व विजांची शक्यता लक्षात घेता नागरिकांना सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.