महाराष्ट्रदिनी विदर्भाचा झेंडा फडकणार
By Admin | Updated: April 30, 2016 03:03 IST2016-04-30T03:03:41+5:302016-04-30T03:03:41+5:30
येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस विदर्भवादी नेहमीप्रमाणे काळा दिवस म्हणून पाळणार असून त्या दिवशी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल.

महाराष्ट्रदिनी विदर्भाचा झेंडा फडकणार
विदर्भवादी संघटना एकजुटीने लढणार : संयुक्त ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ ठरणार
नागपूर : येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस विदर्भवादी नेहमीप्रमाणे काळा दिवस म्हणून पाळणार असून त्या दिवशी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल. सर्व विदर्भवादी संघटना आपापल्या संघटना कायम ठेवून विदर्भाच्या प्रश्नावर एकजुटीने लढणार. तसेच विदर्भाच्या प्रश्नावर एक ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करावा, यावर सर्व विदर्भवादी संघटनांचे एकमत ठरले.
महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी रविभवन येथे विदर्भवादी संघटनांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, हरिभाऊ केदार, अरुण केदार, जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ, अॅड. नीरज खांदेवाले, अॅड. संदेश सिंगलकर,बीआरएसपीचे अहमद कादर, रिपाइं (आ)चे बाळासासाहेब घरडे, अण्णाजी राजेधर, भीमराव फुसे, धनंजय केकापुरे, थॉमस कांबळे, डॉ. राजू मिश्रा, मेहमूद अंसारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लढण्यासाठी कुठलीही कमिटी किंवा नवीन संघटना स्थापन करण्यात येणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याऐवजी सर्व संघटनांनी आपापल्या संघटना कायम ठेवून लढावे. विदर्भाच्या लढ्यासाठी प्रत्येक संघटनेने आपापला कार्यक्रम आयोजित करावा, विदर्भवाद्यांची एकजुटता दिसून यावी म्हणून त्या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावावी. तसेच विदर्भाच्या प्रश्नावर एक कॉमन मिनिमन प्रोग्राम ठरावा, यावर सर्वांचे एकमत झाले. सर्व संघटनांमध्ये समन्वय राहावा, एकमेकांशी संपर्क साधता यावा म्हणून एका व्यक्तीची समन्वयक सचिव म्हणून नियुक्ती केली जाईल, असेही यावेळी ठरले.
आ. जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी विदर्भाच्या प्रश्नावर कॉमन मिनिमम प्रॉग्राम ठरवण्यासोबतच विदर्भातील बुद्धिजीवी लोकांचा एक मेळावा आयोजित करण्याची सूचना केली. सुलेखा कुंभारे यांनी विदर्भाच्या लढाईत सर्व रिपाइं संघटना सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. मधुकर किंमतकर, अॅड. मुकेश समर्थ, अॅड. अनिल किलोर, हरिभाऊ केदार, बाळू घरडे, अरुण केदार, अहमद कादर आदींनीही आपले विचार व्यक्त केले.(प्रतिनिधी)