तीन लाख वैदर्भीयांना बांधणार विदर्भ बंधन

By Admin | Updated: August 9, 2014 02:27 IST2014-08-09T02:27:22+5:302014-08-09T02:27:22+5:30

जनमंचचा विदर्भ लढा सर्वदूर पोहोचवण्यासाठी उद्या, दि. ९ आॅगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण विदर्भात रेल्वे आणि बसस्थानकावर जाऊन प्रवाशांना विदर्भ बंधन बांधण्यात येणार आहे.

Vidarbha Bandhan to build three lakh saints | तीन लाख वैदर्भीयांना बांधणार विदर्भ बंधन

तीन लाख वैदर्भीयांना बांधणार विदर्भ बंधन

नागपूर : जनमंचचा विदर्भ लढा सर्वदूर पोहोचवण्यासाठी उद्या, दि. ९ आॅगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण विदर्भात रेल्वे आणि बसस्थानकावर जाऊन प्रवाशांना विदर्भ बंधन बांधण्यात येणार आहे. ‘रेल देखो, बस देखो’ असे या अभिनव आंदोलनाचे नाव आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत रेल्वे आणि बसस्थानकावर जाऊन जनमंचचे कार्यकर्ते प्रवाशांना विदर्भ बंधन बांधतील. संपूर्ण विदर्भात तब्बल ३ लाख लोकांना विदर्भ बंधन बांधण्यात येणार आहे.
या अभिनव आंदोलनाला विविध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला असून संपूर्ण विदर्भात कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून ३३ ठिकाणी स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अमरावती येथे सुप्रसिद्ध खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा विदर्भ रथ तयार करण्यात आला असून स्वत: सत्यपाल महाराज विदर्भासाठी फिरणार असल्याची माहिती जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी दिली.
लढा विदर्भाचा तसेच जय विदर्भ लिहिलेल्या कॅप आणि टोप्या तसेच टी-शर्ट तयार करण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आंदोलन खेडोपाडी पोहोचले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
विदर्भात नागपूरसह यवतमाळ पांढरकवडा, वणी, राळेगाव व कळंब, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, भंडारा, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, गडचिरोली, अमरावती, परतवाडा, अंजनगावसुर्जी, अकोट, चांदूररेल्वे, वरुड, नांदगाव-खंडेश्वर, आसेगाव, वलगाव, रिसोड, बुलडाणा, अकोला येथे फक्त बसस्थानकावर प्रवाशांना विदर्भ बंधन बांधण्यात येणार आहे तर चंद्रपूर, बल्लारपूर, वर्धा, गोंदिया, वाशिम येथे बस व रेल्वेस्थानकावर प्रवाशांना विदर्भ बंधनबांधण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, विदर्भ जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटीचे अहमद कादर, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक दीपक निलावार व राम नेवले. विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा डॉ. रुपा कुलकर्णी आणि सचिव विलास भोंगाडे, शांतिनिकेतन लाफ्टर क्लब व प्रतापनगर येथील नागरिकांतर्फे डॉ. राम केळापुरे यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha Bandhan to build three lakh saints