विदर्भात सरासरी ३0 टक्के पावसाची तूट कायम !
By Admin | Updated: August 25, 2014 02:23 IST2014-08-25T02:22:27+5:302014-08-25T02:23:15+5:30
वर्हाडातील पावसाची सरासरी ४५ टक्के; शेतकरी चिंतातूर; भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट.

विदर्भात सरासरी ३0 टक्के पावसाची तूट कायम !
अकोला : पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले असले तरी, पूरक पाऊस झाला नसल्याने विदर्भात ३0 टक्के पावसाची तूट कायम आहे. वर्हाडातील ही तूट सरासरी ४५ टक्के असल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. १५ व २३ जुलै या दोन दिवशी पावसाने हजेरी लावली; पण हा पाऊस विदर्भातील एकूण सरासरी गाठण्यास पुरेसा नव्हता. त्यामुळे पावसाची सरासरी ३0 टक्के तूट कायम आहे. सर्वाधिक पावसाची झळ पूर्व विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांना बसली. तुलनात्मकदृष्ट्या पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हय़ाला कमी झळ बसली असून येथे ४६ टक्के कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे.
संपूर्ण विदर्भात आतापर्यंत एकूण सरासरी ७२७.८ मि.मी. पाऊस हवा होता. तथापि, २४ ऑगस्टपर्यंत केवळ ५११.६ मि.मी. एवढीच पावसाची नोंद झाली आहे. यात पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्हय़ात ४७ टक्के तूट कायम असून, यवतमाळ जिल्हय़ात ४९ टक्के तूट आहे. बुलडाणा जिल्हा ३४ टक्के, अकोला २३ टक्के तर अमरावती जिल्हय़ात सरासरीच्या १७ टक्के पाऊस कमी झाला आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हय़ात ४६ टक्के पावसाची तूट कायम आहे. त्या खालोखाल गडचिरोली ३२ टक्के, वर्धा २१ टक्के, भंडारा १६ टक्के, नागपूर १५ तर गोंदिया जिल्ह्यात २ टक्के पावसाची तूट कायम आहे.
*२३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३0 वाजता संपलेल्या चोविस तासात पश्चिम विदर्भातील काही तालुक्यात केवळ १ ते ३ से.मी. पावसाची नोंद पुणे हवामान विभागाने केली आहे.