In Vidarbha, 6712 people suffered snake bite in two and a half years | विदर्भात अडीच वर्षात ६७१२ जणांना सर्पदंश
विदर्भात अडीच वर्षात ६७१२ जणांना सर्पदंश

ठळक मुद्देपूर्व विदर्भात वाढले मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक सर्पदंश नागपूर जिल्ह्यात

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमी झालेले जंगल, झुडुप आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची वाढलेली व्याप्ती, यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्ती त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. परिणामी, सर्पदंशाची प्रकरणे वाढली आहेत. पूर्व विदर्भात २०१७ मध्ये २३५२, २०१८ मध्ये २८४१ तर जुलै २०१९ या सातच महिन्यात १५१९ लोकांना साप चावला. गेल्या अडीच वर्षात ही संख्या ६७१२वर पोहचली आहे. साप चावल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. २०१७ मध्ये १९, २०१८ मध्ये २४ तर गेल्या सात महिन्यात १२ जणांचे बळी गेले आहेत.
साप या सरपटणाºया प्राण्यांबद्दल जेवढी भीती व आकर्षण, जिज्ञासा आपल्या मनात असते तेवढेच अज्ञानही आहे. जगात सापाच्या तब्बल ३ हजार ७५जाती असून, भारतात त्यातील सुमारे २८२ प्रकारचे साप आढळतात व त्यात ७२ साप हे विषारी असतात. त्यातूनही पाच-सहा जातीचे साप जास्त प्रमाणात आढळतात. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बºयाच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते. यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते आॅगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. विशेष म्हणजे, मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत. या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपात्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घेतल्यास सर्पदंशाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. मात्र अनेक जण साप दिसताच कुतूहलापोटी त्याच्याजवळ जातात. साप पकडता येत नसतानाही टीव्हीवरून पाहून तो पकडण्याचा प्रयत्न करतात आणि साप मारण्याच्या घटनेत साप चावण्याचे प्रकार वाढतात. सापावर चुकून पाय पडल्यावर सर्पदंशाचे प्रमाणही मोठे आहे.
नागपूर जिल्ह्यात २१०५ लोकांना सर्पदंश
पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात २०१७ मध्ये सर्पदंशाचे प्रमाण ५०३ होते ते २०१८ मध्ये ५१० झाले. चंद्रपूर जिल्ह्यात २०१७ मध्ये १४२ होते २०१८ मध्ये ४०९ झाले, गडचिरोली जिल्ह्यात २०१७ मध्ये ४६३ होते २०१८ मध्ये ७९५ झाले तर वर्धा जिल्ह्यात २०१७ मध्ये १६९ होते २०१८ मध्ये २७७ वर पोहचले. नागपूर व गोंदिया जिल्ह्यात दंशाचे प्रमाण किंचित कमी झाले. नागपूर जिल्ह्यात २०१७ मध्ये ८३४ तर २०१८ मध्ये ७९५ झाले. गोंदिया जिल्ह्यात २०१७ मध्ये २४१ होते २०१८ मध्ये १९१ झाले. मात्र या सहा जिल्ह्यात सर्वाधिक सर्पदंश नागपूर जिल्ह्यात झाले. या जिल्ह्यात अडीच वर्षात २१०५ लोकांना साप चावले.
सात महिन्यात १२ मृत्यू
सर्पदंशाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. २०१७ मध्ये गोंदिया जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यात १, गडचिरोली जिल्ह्यात १७ असे १९ प्रकरणे होती. २०१८ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ९, गडचिरोली जिल्ह्यात १५ असे एकूण २४ मृत्यू झाले आहेत. जानेवारी ते जुलै या सात महिन्यात १२ मृत्यू झाले असून यात गोंदिया २, चंद्रपूर ४, गडचिरोली ३ व वर्धा ३ मृत्यूचा समावेश आहे.विषारी साप चावलेल्या रु ग्णाला वेळेत ‘अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम’ लस दिल्यास जीवनदायी ठरते. ही लस सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.

सर्पदंश झाल्यास तो साप विषारी आहे किंवा नाही यात वेळ न घालविता आणि स्वत:हून कुठलेही उपचार न करता तातडीने आरोग्य केंद्रावर जाऊन उपचार घेतल्यास जीव वाचू शकतो.
-डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर


Web Title: In Vidarbha, 6712 people suffered snake bite in two and a half years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.