वेदनादायी कॅन्सरवर मिळविला विजय
By Admin | Updated: February 4, 2015 00:58 IST2015-02-04T00:58:51+5:302015-02-04T00:58:51+5:30
पोटात ३० सेंटिमीटरच्या दोन कॅन्सरचे ट्युमर असल्यावर अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. परंतु कामठी येथील रहिवासी हाजी अहमद नानथ यांनी दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या

वेदनादायी कॅन्सरवर मिळविला विजय
३० सेमी.चे दोन ट्युमर काढले : अडीच वर्षांपर्यंत सहन केली पिडा
नागपूर : पोटात ३० सेंटिमीटरच्या दोन कॅन्सरचे ट्युमर असल्यावर अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. परंतु कामठी येथील रहिवासी हाजी अहमद नानथ यांनी दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या या घातक आजारावर विजय मिळवून आणि आज निरोगी जीवन जगत आहे. वेळेत आजाराचे निदान झाल्यास हे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
‘लोकमत’शी चर्चा करताना नानथ म्हणाले, कामठी येथील डॉ. रतन राय हे फॅमिली डॉक्टर आहेत. सहा वर्षांपूर्वी पोटात दुखत असल्याने, जेवण पचत नसल्याने त्यांच्याकडे तपासणी केली. त्यांनी या समस्येला गंभीरतेने घेतले.
कानाच्या खाली असलेल्या गाठीची बायोप्सी करण्यास सांगितले. परंतु याकडे मी दुर्लक्ष केले. त्रास वाढत गेला. काही मित्राच्या सल्ल्यानंतर डॉ. राय यांच्याकडे जाऊन सोनोग्राफी केली. यात कॅन्सर असल्याचे निदान झाले. एमआरआय काढला. दिल्ली, मुंबई येथे चाचणी केली.
तिथेही कॅन्सरच असल्याचे निदान झाले. शेवटी उपचारासाठी तयार झालो. कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ. स्मिता गुप्ते यांच्याकडे उपचार सुरू केला. सहा केमोथेरपी झाल्या. दोन्ही ट्युमर काढले. परंतु अडीच वर्षे जे वेदनादायी उपचार झाले, ते अन्य कुणालाही होऊ नये. आज निरोगी आहे, दोन वर्षांपासून सामान्य जीवन जगत आहे. (प्रतिनिधी)
कुटुंबामुळेच आज जिवंत
नानथ भावूक होत म्हणाले, कुटुंबांची साथ नसती तर आज जिवंत नसतो. त्यांच्या हिंमतीमुळेच हे उपचार घेऊ शकलो. कामठी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपद सोडून उपचार घेतले. नुकतेच कामठीमध्ये अब्दुल्लाह शाह बाबाच्या दरगाहमध्ये प्रशासक म्हणून वक्फ बोर्डने नियुक्त केले आहे. दरगाहच्या सेवेत आहे, असे हाजी अहमद नानथ म्हणाले.