कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात होते पीडितेचे वडील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:05+5:302021-03-04T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलीचे शोषण आणि मेहनतीची कमाई गमावल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या बलात्कार पीडितेचे वडील ...

कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात होते पीडितेचे वडील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीचे शोषण आणि मेहनतीची कमाई गमावल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या बलात्कार पीडितेचे वडील कित्येक दिवस मानसिक तणावात होते. नराधम तरुण येणुरकर हा मुलीची अश्लील रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन सातत्याने पैसे मागत होता. त्यामुळे अखेर हताश होऊन त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलीची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही खरा प्रकार पूर्णपणे सांगितला नाही. परंतु वडिलांना गमावल्यानंतर पीडित मुलीने स्वत: हिंमत दाखवून हुडकेश्वर पोलिसात बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
२० वर्षीय तरुणीचे लैंगिक शाेषण करून तिच्याकडून चार लाख रुपयांची वसुली करणे आणि तिच्या वडिलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणात २२ वर्षीय तरुण ज्ञानेश्वर येणुरकरला हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे. पीडिता दीड वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. आरोपी तरुणही दोन वर्षांपासून सेना व पोलीस भरतीची परीक्षा देत आहे. तो नागपुरात भाड्याने राहतो. त्याचे कुटुंबीय काटोलमध्ये राहतात. रेशीमबाग मैदानात योग आणि व्यायाम करताना जून २०१९ मध्ये दोघांची ओळख झाली. तरुण स्वत:ला अनुभवी असल्याचे सांगत पीडितेला मार्गदर्शन करीत होता. यामुळे दोघांमध्ये अगोदर मैत्री व नंतर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. तरुण पीडितेच्या घरीही ये-जा करू लागला. दरम्यान, त्याने शरीरावर कुठलेही निशाण असल्यास उमेदवारास रिजेक्ट केले जात असल्याचे सांगितले. लहानपणी लागलेली छोटी जखमही रिजेक्ट होण्याचे कारण ठरू शकते, असे सांगत तरुणाने तरुणीला तिच्या शरीराचे फोटो काढून पाठवण्यास सांगितले. फोटोने काम होत नसल्याचे सांगत व्हिडिओ कॉल केला. याची रेकॉर्डिंग करून तरुणीचे आपत्तीजनक फोटो काढले. पीडिता तरुणाची चालबाजी समजू शकली नाही.
सूत्रानुसार, वर्षभरापूर्वी अश्लील क्लिपिंग बनवल्यापासूनच तो ब्लॅकमेल करू लागला. क्लिपिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले. पीडितेचे वडील ड्रायव्हर आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. कसेबसे ते मुलांचे शिक्षण करून घर चालवतात. तरुणाने त्यांना आईच्या उपचारासाठी पैसे मागितले. मुलीच्या दबावामुळे वडिलांनी तरुणाला चार लाख रुपये दिले. त्यांना मुलीच्या व्यवहारामुळे संशय आला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तिने खरा प्रकार सांगितला. या गोष्टीचा वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला. तरुण सातत्याने पैशासाठी दवाब टाकून त्रास देत असल्याने त्यांनी २० फेब्रुवारी रोजी हिंगणा येथील नातेवाईकाच्या शेतात आत्महत्या केली. सुसाईड नोटद्वारे त्यांना तरुण पैशासाठी त्रास देत असल्याचे उघडकीस आले. हिंगणा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासानंतर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर तरुणीला जेव्हा विचारपूस करण्यात आली तेव्हा लैंगिक शोषण केल्याची बाब उघडकीस आली.
बॉक्स
स्वप्न व कुटुंब उद्ध्वस्त झाले
वडिलांना मदत व्हावी आणि आपल्या पायावर उभे होण्यासाठी पीडित तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत होती. तरुण ज्या पद्धतीने बोलायचा त्यामुळे ती प्रभावित झाली. पोलीसात भरती होण्यासोबत एक चांगला जोडीदारही मिळाल्याचा तिला विश्वास बसला. परंतु तरुणाचे खरे रूप समोर आल्यानंतर तिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. वडिलांच्या आत्महत्येचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलिसात भरती होण्याचे स्वप्न आणि कुटुंब दोन्ही उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.