अंधश्रद्धेने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST2017-10-21T01:41:44+5:302017-10-21T01:41:55+5:30

अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत.

Victim taken by superstition | अंधश्रद्धेने घेतला बळी

अंधश्रद्धेने घेतला बळी

ठळक मुद्देमुलाची हत्या, पिता गंभीर जखमी : दिवाळीच्या दिवशी विझला खैरे कुटुंबातील दिवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधश्रद्धेने पछाडलेल्या एका कुटुंबाने ऐन दिवाळीच्या दिवशी शेजारच्या पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला चढवला. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिप्टीसिग्नल भागात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.
कुणाल दयालू खैरे (वय १९) असे मृताचे नाव असून, रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेल्या त्याच्या पित्याचे नाव दयालू खैरे (वय ४५) आहे. पुंजाराम वाडीतील गल्ली नंबर ४ मध्ये दयालू खैरे राहतात. त्यांच्या बाजूलाच आरोपी प्रेमलाल बंडू कोटले (वय ४५) याचे घर आहे. दोघेही परिवार कळमना मार्केटमध्ये मजुरी करतात. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे कुणालने आपल्या होम थियेटरवर मोठ्या आवाजात गाणे वाजवायला सुरुवात केली. ते ऐकून आरोपी प्रेमलाल कोटले धावतच घराबाहेर आला. त्याने दयालूला घराबाहेर बोलवून ‘हमारे घर की नई बहू को देवी के गाणे सुनने के बाद उसके शरीरमे देवता आते है’, असे म्हणत गाणे वाजविण्यास मनाई केली. त्यावरून दयालू आणि प्रेमलालमध्ये वाद झाला. बाचाबाची सुरू असताना आरोपी प्रेमलालचा मुलगा आशिष ऊर्फ चेतराम (वय २०) घरात धावत गेला. त्याने घरातून भाजी कापण्याचा चाकू आणला आणि दयालूच्या पोटावर, छातीवर चाकूचे घाव घातले. ते पाहून दयालूचा मुलगा कुणाल वडिलांना वाचविण्यासाठी धावला. आरोपी प्रेमलालचा मुलगा लंगडा ऊर्फ मनोज आणि रोशन कोटले (वय २६) हेदेखील आले. त्यांनी कुणालवरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे वडिलांसोबतच कुणालही रक्ताच्या थारोळ्यात पडला. पिता-पुत्राला मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले.

सोंगाने घेतला बळी
सर्वत्र दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना घडलेल्या या घटनेमुळे पंजुराम वाडीत तीव्र शोककळा पसरली. कुणालची आई बिंदाबाई हिच्या तक्रारीवरून कळमन्याचे ठाणेदार महेश चाटे यांनी चारही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ आॅक्टोबरपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपी प्रेमलालच्या मुलाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले. त्याच्या सुनेच्या अंगात कथित देव यायचा. या सोंगामुळेच कुणालचा बळी गेला.

Web Title: Victim taken by superstition