हुंड्यासाठी विवाहितेचा बळी
By Admin | Updated: May 21, 2016 02:50 IST2016-05-21T02:50:51+5:302016-05-21T02:50:51+5:30
माहेरून दोन लाखांची रोकड आणावी यासाठी एका विवाहितेला असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

हुंड्यासाठी विवाहितेचा बळी
दोन लाखांची मागणी : आत्महत्येस प्रवृत्त केले
नागपूर : माहेरून दोन लाखांची रोकड आणावी यासाठी एका विवाहितेला असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. गिट्टीखदानमध्ये गुरुवारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या नवऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सुषमा सचिन यादव (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती गिट्टीखदानमधील योगेंद्रनगरात राहत होती. घर बांधण्यासाठी तसेच दीराचे लग्न करायचे आहे म्हणून सुषमाला तिचा नवरा, सासू आणि अन्य मंडळी माहेरून दोन लाख रुपये आणावे यासाठी त्रस्त करीत होते. माहेरची आर्थिक स्थिती दोन लाख रुपये देण्यासारखी नसल्याने सुषमा पैसे आणण्यास नकार देत होती. त्यामुळे आरोपी तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ करीत होते. हा छळ असह्य झाल्यामुळे सुषमाने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा नवरा सचिन रमेश यादव (वय ३०), सासू शारदा रमेश यादव (वय ६०) तसेच पंकज आणि सोनू नामक दीर कारणीभूत असल्याची तक्रार सुषमाची बहीण रितू धनराज यादव (वय ३०, रा. गोरेवाडा, उत्थाननगर मानकापूर) हिने गिट्टीखदान ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)