कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात!
By Admin | Updated: October 19, 2014 00:59 IST2014-10-19T00:59:55+5:302014-10-19T00:59:55+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात अडकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. यावर वेळेत योग्य तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण निवड प्रक्रिया

कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात!
२७ रोजी व्यवस्थापन व विद्वत परिषदेची संयुक्त बैठक
आशिष दुबे - नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात अडकण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. यावर वेळेत योग्य तोडगा निघाला नाही, तर संपूर्ण निवड प्रक्रिया संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येत्या २७ आॅक्टोबरपासून व्यवस्थापन व विद्वत परिषदेच्या संयुक्त बैठकीने या निवड प्रक्रियेची सुरुवात होत आहे.
माहिती सूत्रानुसार या तांत्रिक पेचाची कुलगुरू पदाचे दावेदार व विद्यापीठातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा चाहूल लागली आहे. त्यामुळेच संयुक्त बैठकीपूर्वी त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. गत काही दिवसांपासून त्यावर चर्चा सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शनिवारी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन सुद्धा समाधान शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. जर कुलगुरूंची निवड प्रक्रिया तांत्रिक पेचात अडकली, तर गत २००४ प्रमाणे यंदा पुन्हा विद्यापीठात स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. यात विद्यापीठाला नियमित कुलगुरूसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षणतज्ज्ञ व विधीतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ नुसार राज्यातील कोणत्याही विद्यापीठातील कुलगुरूच्या नियुक्तीसाठी निवड समितीची स्थापना केल्या जाते. या समितीमधील एका सदस्याची निवड ही विद्यापीठाची व्यवस्थापन व विद्वत परिषदेच्या सदस्यांमधून केली जाते. त्यासाठी परिषदेची संयुक्त बैकठ बोलाविली जाते. यानंतर निवड झालेल्या व्यक्तीचे नाव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविल्या जाते. शेवटी निवड समितीतर्फे पाच लोकांच्या नावाची राज्यपाल कार्यालयाकडे शिफारस केल्या जाते. त्याआधारे संबंधित पाचही लोकांच्या मुलाखती घेऊन त्यापैकी एकाची कुलगुरू म्हणून नियुक्ती केल्या जाते. (प्रतिनिधी)
काय आहे तांत्रिक पेच
या संपूर्ण प्रक्रियेत प्रामुख्याने दोन तांत्रिक पेच उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापैकी पहिला पेच म्हणजे, येत्या २७ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन व विद्वत परिषदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे राहणार आहे. मात्र ते स्वत: कुलगुरू पदाचे प्रबळ दावेदार राहणार आहेत. त्यामुळे एखादा दावेदार स्वत:च निवड प्रक्रियेतील सदस्याची निवड करू शकतो काय, असा पेच निर्माण होण्याची भीती आहे. याशिवाय बैठकीला दोन्ही परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यातून ते निवड समितीच्या सदस्याची निवड करणार आहे. परंतु व्यवस्थापन व विद्वत परिषदेतील सदस्यापैकी काहीजण स्वत:च कुलगुरू पदाच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. अशा स्थितीत ते निवड समितीच्या सदस्याची निवड करू शकतात का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.