राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:07+5:302021-02-14T04:08:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन ...

Veterinary hospital in every taluka of the state in two years | राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय

राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन वर्षांत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील प्रत्येक तालुक्यात २०२२ पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी शनिवारी येथे सांगितले. या उपक्रमांतर्गंत नागपूर विभागात १५ फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांचा जिल्हा परिषद प्रांगणात शनिवारी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या १५ पशुवैद्यकीय रुग्णालयांचा आज प्रारंभ करण्यात आला असून, यातील तीन रुग्णालये जिल्ह्यात असतील. ग्रामीण भागात अशा प्रकारची रुग्णालये सुरू करत असून, अद्यापही अशी रुग्णालये प्रत्येक गावात नाहीत. त्यामुळे आजारी पशुधनाला रुग्णालयापर्यंत नेणे मोठे अडचणीचे असते. आता शेतकऱ्यांची ही समस्या सुटणार असून, १९६२ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधला असता, वैद्यकीय पथकासह हे फिरते रुग्णालय शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचेल.

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालायांच्या माध्यमातून आता थेट आजारी पशुरुग्णांवर शेतकऱ्यांच्या दारात उपचाराची सुविधा मिळणार आहे. या माध्यमातून रोगप्रतिबंधक लसीकरण व उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंच्या रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतनाचीही सोय उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांना पशुआहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शन करण्याचीही व्यवस्था राहील.

बर्ड फ्ल्यूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान

राज्यात बर्ड फ्ल्यू आटोक्यात आला असून, बर्ड फ्ल्यूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही, असे सांगून केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यास ४८ तासांत त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र, त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्ष्यांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Veterinary hospital in every taluka of the state in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.