ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते गाडे गुरुजी अनंतात विलीन
By Admin | Updated: June 26, 2014 00:58 IST2014-06-26T00:58:51+5:302014-06-26T00:58:51+5:30
ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव गाडे उपाख्य गाडे गुरुजी यांच्यावर बुधवारी अंबाझरी घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोदयी कार्यकर्त्या अपर्णा नंदागळे यांनी

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते गाडे गुरुजी अनंतात विलीन
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
नागपूर : ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव गाडे उपाख्य गाडे गुरुजी यांच्यावर बुधवारी अंबाझरी घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोदयी कार्यकर्त्या अपर्णा नंदागळे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी गांधीवादी आणि सर्वोदयी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जी.एम. टावरी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी माजी कुलगुरूहरिभाऊ केदार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. ते म्हणाले गाडे गुरुजी यांनी संस्कारक्षम नवी पिढी घडवण्याचे कार्य केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण कार्यरत राहू.
अॅड. मा.म. गडकरी यांनी महात्मा गांधीजींच्या खऱ्या वारसदारांपैकी गाडे गुरुजी एक असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय प्रा. दिलीप महल्ले, भाऊ भोगे, यादवराव देवगडे, सु.श्री पांढरीपांडे, मंजूषा सावरकर, गाडे गुरुजींचे सहकारी अरुण देशपांडे, जयंत नंदापुरे, प्रा. ए.एस. उखळकर, वाघे गुरुजी यांनी गाडे गुरुजी यांच्या स्मृतींना उजाळा देत शोकसंवेदना व्यक्त केल्या. अरविंद देशमुख यांनी संचालन केले.
पवनारच्या धाम नदीत होणार अस्थिविसर्जन
गाडे गुरुजी हे संस्कार परिवाराचे प्रणेते होते.
गीताईच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. खेडोपाडी त्यांनी संस्कार केंद्र सुरू केलीत.
सर्वोदयी विचारांच्या या चिंतकाचे अस्थिविसर्जन हे उद्या गुरुवारी पवनार येथील धाम नदीमध्ये करण्यात येईल, असे त्यांचे सहकारी अरुण देशपांडे उपाख्य देशपांडे गुरुजी यांनी शोकसभेनंतर जाहीर केले. (प्रतिनिधी)
गाडे गुरुजींचे होणार संस्कार स्मारक
उमरेड रोडवर सर्वोदय आश्रमाची काही एकर जागा आहे. या जागेवर गाडे गुरुजी यांचे संस्कार स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडे गुरुजी यांचे सुद्धा या स्मारकाला समर्थन होते. अरविंद देशमुख यांनी त्यासाठी सर्वप्रथम एक लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आणखी काही लोक मदत करीत आहेत. गाडे गुरुजींचे हे स्मारक लवकरच उभारण्यात येणार असून यात लहान मुलांना संस्कारांचे धडे दिले जातील, असे देशपांडे गुरुजी यांनी संगितले.
अंत्यसंस्कारातूनही संदेश
गाडे गुरुजी यांनी आयुष्यभर समाजाचाच विचार केला. संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले. परंतु आपल्या मृत्यूनंतरही त्यांचे हे कार्य सुरू राहिले, याची प्रचिती बुधवारी त्यांच्या अंत्यसंस्कारातूनही दिसून आली. पर्यावरणाच्या दृष्टीने पार्थिव जाळण्यासाठी लाकडांऐवजी १०० टक्के गोवऱ्यांचा वापर करून करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहकार्याने अंबाझरी घाटावर याचा प्रयोगिक तत्त्वावर वापर महिनाभरापूर्वी सुरू झाला. गाडे गुरुजी यांच्यावर पार्थिवावरही याच पद्धतीने संपूर्णपणे पर्यावरणाला पोषण असे हे अंत्यसंस्कार करण्यात आले.