On the verge of collapse of the country's economy: Congress spokesperson Pawan Kheda | देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे. आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, कृषी क्षेत्रावरील संकटामुळे वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, बँकिंग क्षेत्रापुढील संकट, महिलांची सुरक्षा असे गंभीर प्रश्न देशापुढे उभे ठाकले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अ‍ॅड. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते.
मागील ५० वर्षातील बेरोजगारीचा उच्चाक गाठला आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे समाजात अशांतता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. खासगी गुंतवणुकीपोटी औद्योगिक विकास घटला आहे. उत्पादनक्षेत्रातील वाढ उणे झाली आहे. नोटबंदीमुळे देशाचा विकास दर २ टक्केहून अधिक कमी झाला. जीएसटीच्या माध्यमातून लोकांवर कर आकारला जात आहे. नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोठ्या अपेक्षा ठेवून निवडून दिले होते. परंतु चुकीच्या धोरणामुळे लोकांचा अपेक्षाभंग झाल्याचा आरोप पवन खेडा यांनी केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात ५ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत देशभरात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

फोन टॅप प्रकरणाची चौकशी व्हावी
‘पेगॅसस’ या इस्रायली स्पायवेअरचा वापर करून काही अज्ञात लोकांनी जगभरात हेरगिरी केली. इस्रायली कंपनीने आम्ही सरकारी कंपनीलाच स्पायवेअरचा वापर करू देत असल्याचे स्पष्ट केले आहे. हा गंभीर प्रकार आहे. भारतातील कुणाकुणाचे फोन टॅप करण्यात आले याची चौकशी व्हावी, अशी मागणी पवन खेडा यांनी केली.

राज्यात स्थिर सरकार गठित व्हावे
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.सरकारमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याची हिंमत नाही. दुसरीकडे राज्यात नवीन सरकार गठित होण्याला विलंब होत आहे. हा प्रकार देशातील जनता बघत आहे. राज्यात स्थिर सरकार गठित व्हावे, अशी लोकांची इच्छा आहे. याबाबत लवकरच स्थिती स्पष्ट होईल. अशी अपेक्षा पवन खेडा यांनी व्यक्त केली. निवडणुकीत आयारामांना लोकांनी धडा शिकवल्याचे सातारा येथील निकालावरून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: On the verge of collapse of the country's economy: Congress spokesperson Pawan Kheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.