व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनच्या कमरतेमुळे मृत्यूचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST2021-04-20T04:09:11+5:302021-04-20T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. सोमवारी एकाच ...

व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनच्या कमरतेमुळे मृत्यूचे तांडव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहे. सोमवारी एकाच दिवसात जिल्ह्यात ११३ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २४ तासांतील ही सर्वाधिक मृत्युसंख्या ठरली. देशात इतर मोठ्या शहरांतदेखील रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागपुरात मृत्यूची संख्या जास्त आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरदेखील व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनसह आवश्यक प्रमाणात इतर वैद्यकीय सुविधा निर्माण झालेल्या नाही. सरकारी व प्रशासकीय अनास्थेमुळे मृत्यूचे आकडे येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची भीती वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये ६ हजार ३६४ नवे बाधित आढळून आले. एकूण बाधितांपैकी ४ हजार ५७८ शहरातील असून, १ हजार ७८० ग्रामीण भागातील आहेत. मृतांमध्ये शहरातील ७५, ग्रामीणमधील ३२ व जिल्ह्याबाहेरील सहा जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकण ३ लाख २९ हजार ४७० बाधित व ६ हजार ३८६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
वैद्यकीय सुविधा नाहीत, कसे वाचणार रुग्ण ?
नागपुरातच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्युसंख्या का आहे, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांसह नागपुरातील वैद्यकीयतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली. रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स तसेच ऑक्सिजनची प्रचंड कमतरता आहे. उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन्स तसेच औषधांचादेखील पुरवठा कमी आहे. वैद्यकीय सुविधाच नसताना रुग्णालयांवर ताण वाढतो आहे. अशा स्थितीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
चाचण्यांची संख्या घटली, बरे होणारे वाढले
सोमवारच्या अहवालानुसार ५ हजार ९७ बाधित ठीक झाले. यात शहरातील ३ हजार ९९७, तर ग्रामीणमधील १ हजार १०० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्या मात्र घटली आहे. १७ हजार ९७८ जणांची चाचणी झाली. यात शहरातील १३ हजार ३९८ व ग्रामीणमधील ४ हजार ५८० जणांचा समावेश होता.
सक्रिय रुग्ण ७० हजारांपार
जिल्ह्यात ७० हजार ३९७ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ४२ हजार २८५ व ग्रामीणमधील २८ हजार ११२ जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी इस्पितळांत २० हजार २४६रुग्ण दाखल आहेत, तर ५० हजार १५१ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.
असे वाढले मृत्यू
दिनांक -मृत्यू-नवे पॉझिटिव्ह
१५ एप्रिल- ७४ -५,८१३
१६ एप्रिल- ७५ -६,१९४
१७ एप्रिल- ७९ -६,९५६
१८ एप्रिल- ८५ -७,१०७
१९ एप्रिल- ११३ -६,३६३