व्हेंटिलेटर ठरत आहे मृत्यूचे सापळे!
By Admin | Updated: March 6, 2015 00:33 IST2015-03-06T00:33:10+5:302015-03-06T00:33:10+5:30
स्वाईन फ्लूने नागपूर विभागात आतापर्यंत ७४ रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु या मृत्यूमागील कारणांचा अद्यापही कोणी शोध घेतला नाही. एकट्या मेडिकलमध्ये ३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

व्हेंटिलेटर ठरत आहे मृत्यूचे सापळे!
लोकमत विशेष
सुमेध वाघमारे नागपूर
स्वाईन फ्लूने नागपूर विभागात आतापर्यंत ७४ रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु या मृत्यूमागील कारणांचा अद्यापही कोणी शोध घेतला नाही. एकट्या मेडिकलमध्ये ३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण हे शेवटच्या घटकेला व्हेंटिलेटरवर होते. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाच्या रक्ताची तपासणी एबीजी (ब्लड गॅस एनलायझर) नावाच्या यंत्राने करणे आवश्यक असते. परंतु मेडिकलमध्ये हे यंत्रच उपलब्ध नाही. यामुळे व्हेंटिलेटरवरील अंदाजाने आॅक्सिजनचे प्रमाण कमी-जास्त केले जाते, तर दुसरीकडे विशेष तज्ज्ञाकडून हे यंत्र लावण्यात येत नसल्याने हे व्हेंटिलेटरच मृत्यूचे सापळे ठरत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यात अडचण जाते. अशा वेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम व्हेंटिलेटर अत्याधुनिक यंत्र करते. या यंत्राचे वैशिष्ट्य असे की जोपर्यंत रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे तोपर्यंत तो जगतो. यंत्र काढून टाकताच आणि रुग्ण सुस्थितीत आला नाही तर त्याची दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे संगणकाच्या आकाराचे हे यंत्र फार महत्त्वाचे ठरते. सद्यस्थितीत मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात पाच व्हेंटिलेटर आहेत. परंतु हे व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजन, कार्बनडाय आॅक्साईड व अॅसिड मोजण्यासाठी वापरण्यात येणारे ‘एबीजी’ हे यंत्रच नाही. यामुळे आधीच अत्यवस्थ असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांना अंदाजाने आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो.
अनुभव पडतो कमी
मेडिकलमधील स्वाईन फ्लू वॉर्डात अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचे काम निवासी डॉक्टरच करतात. परंतु या डॉक्टरांचा अनुभव व मशीनविषयी अभ्यास फार कमी असल्याने ते धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक ठरते. कारण व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाची श्वासोच्छवासाची प्रक्रिया बंद करावी लागते. अनेक वेळा रुग्णाच्या मेंदूचे कार्य बंद पडलेले असते, अशा वेळी डॉक्टरांना रुग्णाच्या मेंदूचे कार्य करावे लागते. यामुळे यात चूक होणे रुग्णाच्या जीवावरच बेतते.
व्हेंटिलेटरमुळे वाचणाऱ्या रुग्णांची संख्या ५० टक्के
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर लावून वाचलेल्या रुग्णांची संख्या ५० टक्के आहे. मोठ्या इस्पितळांमध्ये ही टक्केवारी ६० ते ७० दरम्यान आहे. भारतात ७० टक्क्यांच्यावर कुठलेही इस्पितळ गेले नसल्याचे आकडेवारी सांगते.