Vendors in crisis due to crowd of customers in Nagpur | नागपुरात ग्राहकांच्या गर्दीने विक्रेते संकटात

नागपुरात ग्राहकांच्या गर्दीने विक्रेते संकटात

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये करावे लागते अटींचे पालन : आवश्यक वस्तूंची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनलॉक-१ मध्ये सोमवारपासून महाल, सक्करदरा, नंदनवन आणि शहरातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत. काही वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी दिसून येत आहे. रेडिमेड कपडे, इलेक्ट्रिक आणि पादत्राणांच्या दुकानांमध्ये वर्दळ दिसून आली. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना अडचणी येत असल्याने विक्रेते संकटात आले आहेत. पोलीस आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद केली.
लॉकडाऊनमुळे जवळपास ७५ दिवस बंद असलेली बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोमवारी सुरू झाली. लोकही आता आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांचे सुती कपड्यांच्या खरेदीला प्राधान्य आहे. लहान मुलांचे कपडे, अंतर्वस्त्र, पादत्राणे, महिलांच्या शृंगार वस्तू आदींची खरेदी पुढे वाढणार आहे.
दुकानांची साफसफाई करून व्यापारी आता नव्या जोमाने कामाला लागले आहेत. रेड झोनमध्ये व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास मनाई आहे. कोरोना संक्रमणामुळे अनेक ठिकाणी व्यवसाय बंद आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून खरेदी-विक्री करावी लागणार आहे. दुकानात सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर वापराचे नियम न पाळल्यास संक्रमणाची भीती कायम आहे. सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती सीझन नॉव्हेल्टिजचे संचालक विकास गौर यांनी दिली.
अनलॉकच्या तीन टप्प्यांचे पालन सर्वच व्यावसायिकांना करावे लागणार आहे. सर्व शाळांचे आॅनलाईन वर्ग सुरू असल्याने स्टेशनरीच्या दुकानांमध्ये गर्दी नाही. शाळा सुरू होण्याचा निर्णय जुलै महिन्यात होणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच वह्या, पुस्तके आणि स्टेशनरीला मागणी राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Vendors in crisis due to crowd of customers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.