वाहन परवान्यासाठी आलेल्यांना पाठविले घरी
By Admin | Updated: September 2, 2014 01:13 IST2014-09-02T01:13:33+5:302014-09-02T01:13:33+5:30
परिवहन उपायुक्तांनी (संगणक) सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) १ सप्टेंबरपासून शिकाऊ परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अर्ज करून अपॉर्इंटमेंट’ची (पूर्ववेळ घेणे) सक्ती केली आहे.

वाहन परवान्यासाठी आलेल्यांना पाठविले घरी
आरटीओची ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची बळजबरी : नागरिकांमध्ये असंतोष
नागपूर : परिवहन उपायुक्तांनी (संगणक) सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) १ सप्टेंबरपासून शिकाऊ परवानासाठी (लर्निंग लायसन्स) आॅनलाईन अर्ज करून अपॉर्इंटमेंट’ची (पूर्ववेळ घेणे) सक्ती केली आहे. परंतु आरटीओ शहर कार्यालयात आज एकही उमेदवार ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ घेऊन आला नव्हता. यामुळे कार्यालयात शिकाऊ परवाना काढण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांना घरी पाठविले. वेठीस धरणाऱ्या या प्रकारामुळे नागपूरकरांमध्ये असंतोष आहे.
आरटीओचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी परिवहन उपायुक्त (संगणक) महाजन यांनी लर्निंग लायसन्ससाठी येणाऱ्या उमेदवारांनी ‘अपॉर्इंटमेंट’ घेऊनच कार्यालयात हजर राहण्याची सक्ती केली. जे उमेदवार अपॉईटमेंट घेऊन येतील केवळ त्याच उमेदवाराचे अर्ज लर्निंग लायसन्ससाठी स्वीकारण्याचे आदेश राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयाला दिले. त्यानुसार सोमवारपासून शहर आरटीओ कार्यालयाने याची अंमलबजावणी करणे सुरू केले. आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कार्यालयात शंभरावर उमेदवार आले होते. परंतु यातील एकानेही आॅनलाईन अपॉर्इंटमेंट घेतली नव्हती. यामुळे त्यांना लर्निंग लायसन्सची प्रक्रिया होणार नसल्याच्या सूचना देऊन चक्क घरी पाठविण्यात आले. अनेक उमेदवारांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या, परंतु त्यांनी उपायुक्तांचे आदेश दाखवित हात वर केले. उल्लेखनीय म्हणजे, ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ची अट फक्त शहर आरटीओ कार्यालयापुरतीच मर्यादित आहे.
लर्निंग लायसन्साठी आलेला उमेश नारनवरे यांनी सांगितले, हा वेठीस धरण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे यात दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. ज्यांच्या घरी संगणक नाही, ज्यांना संगणकाविषयी ज्ञान नाही किंवा ज्यांचे शिक्षण कमी झालेले असेल त्यांना लायसन्सपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचेही तो म्हणाला. (प्रतिनिधी)