रेल्वेस्थानकावर वाहन चोरीचे सत्र कायमच
By Admin | Updated: November 8, 2014 02:50 IST2014-11-08T02:50:54+5:302014-11-08T02:50:54+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात आरपीएफ ठाण्यासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे.

रेल्वेस्थानकावर वाहन चोरीचे सत्र कायमच
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात आरपीएफ ठाण्यासमोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे. परंतू येथून सातत्याने जानेवारी महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत ११ दुचाकी चोरीला गेल्या असल्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि नागरिक भयग्रस्त झाले आहेत. या चोऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यासमोर होत असून लोहमार्ग पोलिसही याबाबत काहीच उपाययोजना करण्यास तयार नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर वाहन चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात रेल्वे सुरक्षा दलाचे ठाणे आहे. या ठाण्याच्या समोर शासकीय वाहनांच्या पार्किंगची जागा आहे. येथे रेल्वे कर्मचारी, प्रवासी, आरपीएफचे जवान आपल्या दुचाकी उभ्या करतात. येथे कुठलाच रेल्वे कर्मचारी उपस्थित राहत नाही. याच बाबीचा फायदा घेऊन या भागात वाहन चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. जानेवारी २०१४ पासून नोव्हेंबर २०१४ दरम्यान या पार्किंगमधून तब्बल १० दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आहे. दोन दिवसापूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पॉईंटमन म्हणून कार्यरत असलेल्या संघपाल धनविजय (५१) रा. भगवाननगर नागपूर या रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला गेली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा संकोच कालीचरण गायकवाड (२२) रा. इमामवाडा झोपडपट्टी यांची स्प्लेंडर प्लस क्रमांक एम. एच. ३१ डब्लु. एस. ७४६९ २८ आॅक्टोबरला चोरीला गेली. तो आपल्या मामाला सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आला होता. येथून नेहमीच दुचाकी चोरीला जाऊनही लोहमार्ग पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहन चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. (प्रतिनिधी)