नागपूर जिल्ह्यात वाहन शोरूम मालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:02 PM2019-07-02T12:02:27+5:302019-07-02T12:04:30+5:30

शहरात दुचाकी वाहनांचे शोरूम उघडून कमी दरात वाहने मिळणार असल्याची जाहिरात करण्यात आली. अनेकांनी विश्वास ठेवत शोरूम मालकाला पैसेही दिले. त्याने अनेकांकडून पैसे गोळा करून पोबारा केला.

vehicle showroom owner ran away in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात वाहन शोरूम मालक पसार

नागपूर जिल्ह्यात वाहन शोरूम मालक पसार

Next
ठळक मुद्देग्राहकांची लाखो रुपयांनी फसवणूककमी दरात वाहने देण्याची बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात दुचाकी वाहनांचे शोरूम उघडून कमी दरात वाहने मिळणार असल्याची जाहिरात करण्यात आली. अनेकांनी विश्वास ठेवत शोरूम मालकाला पैसेही दिले. त्याने अनेकांकडून पैसे गोळा करून पोबारा केला. या व्यवहारात विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच काहींनी पोलिसात तक्रार नोंदविली.
आकाश भोयर, रा. खंडाळा याने वर्षभरापूर्वी कळमेश्वर शहरात जयेश मोटर्स नावाने वाहनांचे शोरूम सुरू केले आणि कमी दरात विविध कंपन्यांची वाहने मिळणार असल्याची जाहिरात केली. इतरांच्या तुलनेत किमान दोन हजार रुपयांनी कमी किमतीत वाहन मिळत असल्याने काहींनी वाहनांची खरेदीही केली. त्यात मंगेश सुभाष कुरडकर, रा. कळमेश्वर याचाही समावेश आहे. मंगेशने या शोरूममधून रोख रक्कम देऊन दुचाकी खरेदी केली. काहींनी कर्जावर वाहनांची खरेदी केली.
यात आकाशने फायनान्स कंपनीला ‘डाऊन पेमेंट’पोटी ग्राहकाने दिलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिल्याचे निदर्शनास आले. काहींना त्यांच्या कर्जाचे मासिक हप्ते वाढवून देण्यात आले. त्याची सूचनाही त्यांना दिली नव्हती. हा प्रकार हळूहळू ग्राहकांच्या निदर्शनास आला. त्यांनी आकाशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क होत नसल्याने तसेच तो शोरूममध्ये भेटत नसल्याने अनेकांनी त्याच्या खंडाळा येथील घरी जाऊन चौकशी केली. त्यावर आकाश अनेक दिवसांपासून घरी आला नसल्याचे सांगून कुटुंबीयांनी ग्राहकांची बोळवण केली.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली. शिवाय, आकाश सध्या कुठे आहे, तो काय करतो, त्याने किती ग्राहकांकडून किती रक्कम घेत त्यांना गंडविले, याबाबत कुणालाही माहिती नाही. शिवाय, तक्रार स्वीकारूनही पोलीस त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करायला तयार नाहीत. त्यामुळे तो हाच प्रयोग दुसऱ्या शहरात कडून नागरिकांना गंडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे पोलीस त्याच्याविरुद्ध गुन्हा का नोंदवित नाही, याचे कारणही स्पष्ट करीत नाही.

बनावट कागदपत्रे
कुरडकरने आकाशकडून नगदी रक्कम देऊन मोटरसायकल खरेदी केली. त्याच्याकडे पैसे दिल्याची पावतीही आहे. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची अजूनही आरटीओमध्ये नोंदणी झालेली नाही, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय, त्याला आरसी बुकही दिले नाही. त्याच्याकडे असलेला इन्शुरन्स बनावट असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. असाच प्रकार अनेकांसोबत घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संशयास्पद भूमिका
 व्यवहारात आकाशने लाखो रुपयांची माया जमविल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. दुसरीकडे, त्याच्याकडून वाहन खरेदी करणाऱ्यांपैकी १२ जणांनी कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी मात्र त्याच्यावर अद्यापही गुन्ह्याची नोंद केली नाही. सदर प्रकरण तपासात असल्याचे कारण ग्राहकांना सांगितले जात असल्याने या प्रकरणात पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: vehicle showroom owner ran away in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.