मंगळवारी बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:43+5:302021-01-13T04:21:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप ...

मंगळवारी बाजारात भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवडी बाजारात दुकानाच्या जागेच्या वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार भावांनी एका भाजी विक्रेत्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याची हत्या केली. सदरमधील मंगळवारी बाजारात शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. अक्षय किशोर निर्मले (वय २३) असे मृताचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणाऱ्यांची नावे निखिल वर्मा, रितेश वर्मा राजू वर्मा आणि सुमित वर्मा अशी आहेी. आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत. ते कळमन्यातील रहिवासी असून मंगळवारी बाजारात ते भाजीचे दुकान तसेच चहाचा ठेला लावतात.
आरोपी वर्मा बंधूंची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. अक्षय निर्मले हासुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता. तो डिसेंबरमध्ये कारागृहातून बाहेर आला आणि भाजीचे दुकान लावू लागला. त्याने बाजारात आपली पकड बनविण्याचे प्रयत्न चालविले होते. काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागेवर निर्मलेने कब्जा करण्याचे प्रयत्न चालविले होते. तर ती जागा हडपण्यासाठी आरोपी वर्मा बंधूदेखील प्रयत्नशील होते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बाचाबाची आणि एकमेकांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अक्षय निर्मले गुन्हेगारी वृत्तीचा असून तो जुमानत नसल्याने बाजारात आपले वर्चस्व कमी होण्याची भीती वाटत असल्याने वर्मा बंधूंनी निर्मलेच्या हत्येचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी वर्मा बंधूंनी निर्मलेच्या भाजीच्या दुकानासमोर आपला चहाचा हातठेला लावला. निर्मलेने हातठेला हटव नाही तर तोडफोड करून फेकून देईन, अशी आरोपींना धमकी दिली. त्यामुळे आरोपी संतप्त झाले. निर्मले काही वेळेनंतर ग्राहकांमध्ये गुंतल्याचे पाहून रात्री ७ ते ७.२० च्या सुमारास चारही भावांनी त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. शेकडो लोकांसमोर ही थरारक घटना घडली. दहशतीमुळे अनेक दुकानदार आणि ग्राहक पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी निर्मलेला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झालेली नव्हती.
----
हत्येच्या मालिकेमुळे दहशत
गेल्या पाच दिवसात नागपुरात हत्येची मालिका घडल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तीन दिवसांतील हत्येची ही तिसरी घटना आहे. अजनीत सुमित पिंगळे, यशोधरानगर रियाज अन्सारी आणि सदरमध्ये अक्षय निर्मले या तिघांची हत्या झाली. अजनीतील पिंगळे आणि आज आरोपी वर्मा बंधूंनी मारलेला निर्मले हे कुख्यात गुंडच होते. गेल्या वर्षी पिंटू ठवकर हत्याकांडात निर्मले आरोपी होता.