वेगाशी स्पर्धा नडली

By Admin | Updated: December 26, 2016 02:23 IST2016-12-26T02:23:38+5:302016-12-26T02:23:38+5:30

वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे निघालेली कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली.

Vegas contested | वेगाशी स्पर्धा नडली

वेगाशी स्पर्धा नडली

दुभाजकावरून उसळलेली कार ट्रकवर आदळली
हिंगणा/ नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे निघालेली कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर ट्रकचालक गंभीर जखमी आहे. नागपूर - वर्धा - चंद्रपूर महामार्गावरील जामठा शिवारात रविवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे काही वेळ मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती.
एमएच-४० / एफ-०९५२ क्रमांकाच्या रिटज् कारमध्ये बसून चार जण वर्धेहून नागपूरकडे येत होते. कार मर्यादेपेक्षा जास्त वेगात होती. नागपूरनजीकच्या जामठा शिवारात पोहोचताच ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या आयशर ट्रकवर (एमएच-४९/९१९२) आदळली. त्यानंतर तेवढ्याच वेगात ही कार परत वर्धा मार्गावर येऊन पडली. कारचा वेग आणि धडक एवढी जोरदार होती की आयशर ट्रकही उलटला अन् कारचे इंजिन तुटून १५ ते २० फूट दूर वेगळे होऊन पडले.
कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ट्रकचालक राकेश शंभरकर यालाही या अपघातात जबर दुखापत झाली.(प्रतिनिधी)

वाहतुकीला अडथळा
या भीषण अपघाताने दोन्ही वाहने दोन बाजूच्या रस्त्यावर उलटून पडल्यामुळे नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. माहिती कळताच बुटीबोरी, हिंगणा आणि सोनेगाव तसेच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


कारमध्ये बसलेल्या चारही जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची ओळख लवकर पटू शकली नाही.मृतापैकी एकाच्या खिशात आधार कार्ड होते. मात्र, मृतांचे चेहरे बिघडल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी हिंगणा पोलिसांनी कारच्या नंबरवरून प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तीन तासानंतर आनंद रामसिंग पारधी (वय २५) , चंद्रशेखर ऊर्फ बंटी जयचंद चव्हाण (वय २४, रा. खापरी, पुनर्वसन वसाहत) वंशपती शंकर पटेल (वय ३०, रा.भोपाळ, मध्य प्रदेश) आणि रवी रहांगडाले (वय २५ रा. खापरी, पुनर्वसन वसाहत) यांची ओळख पटली.

Web Title: Vegas contested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.