वीणा बजाज गजाआड
By Admin | Updated: October 7, 2015 03:22 IST2015-10-07T03:22:08+5:302015-10-07T03:22:08+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वीणा बजाज यांना मंगळवारी दुपारी अटक केली.

वीणा बजाज गजाआड
एसीबीची कारवाई : सिंधू एज्युकेशन सोसायटीतील गैरव्यवहार
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वीणा बजाज यांना मंगळवारी दुपारी अटक केली. सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या त्या पत्नी असून, डॉ. बजाज यांनाही लवकरच अटक केली जाईल असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.पदाचा दुरुपयोग करून डॉ. दीपक बजाज आणि वीणा बजाज यांनी अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उकळल्याची आणि त्यातून मोठी मालमत्ता जमविल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर गेल्या आठवड्यात एसीबीच्या पथकाने डॉ. बजाज यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात धाड टाकून झडती घेतली.तब्बल तीन दिवस झाडाझडती घेतल्यानंतर एसीबीच्या पथकाला सुमारे ३२ लाखांची रोकड, ४८८ ग्राम सोने आणि ५.८५ किलो चांदी सापडली.याशिवाय त्यांच्याकडे नऊ वाहने आढळली. त्यात एक ५५ लाखांची आलिशान कारही आहे. घरातील फर्निचर तसेच अन्य संपत्तीचा हिशेब केल्यास ही मालमत्ता तीन कोटींच्या घरात जाते. ही मालमत्ता कशी जमवली, त्याची एसीबीला बजाज दाम्पत्याकडून माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांच्या गैरव्यवहाराचे भक्कम पुरावे असलेली कागदपत्रे एसीबीने जप्त केली. त्यानंतर बजाज दाम्पत्याविरुद्ध अनेक तक्रारदारही पुढे आले. त्यामुळे एसीबीने जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटक टाळण्यासाठी डॉ. बजाज यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, एसीबीने बजाज यांच्याविरोधात गैरव्यवहाराचे भक्कम पुरावे असल्याची तक्रार नोंदवल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)
धडपड व्यर्थ ठरली
अटक टाळण्यासाठी बजाज दाम्पत्यांनी अज्ञात ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र, एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बजाज यांच्या मागावर एक पथक होते. डीवायएसपी सुपारे, पीआय शेटे, पीआय मोनाली चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी ४ च्या सुमारास हैदराबाद हाऊस परिसरात वीणा बजाज यांना अटक केली. नंतर त्यांना जरीपटका ठाण्यात नेण्यात आले. डॉ. दीपक बजाज यांचा शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच आम्ही अटक करू, असा विश्वास अधीक्षक राजीव जैन यांनी व्यक्त केला आहे.